Food recipe : वजन नियंत्रित ठेवण्यासाठी डाएटमध्ये पालकाचे चविष्ट सूप समाविष्ट करा; वाचा ही रेसेपी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 06:49 PM2022-09-15T18:49:33+5:302022-09-15T18:49:54+5:30
Healthy Recipe: पचायला हलके आणि चवीला रुचकर पालकाचे सूप एकदा करून बघा, वारंवार कराल!
रात्रीचे जेवण पचायला हलके असावे असे म्हणतात. त्यात भाज्या, पालेभाज्यांचे सूप घेणे हा पर्याय जास्त सोयीचा ठरतो. कमी श्रमात पोटभरीचे जेवण हवे असेल तर पालकाचे सूप जरूर करून बघा. पालकाचे गुणधर्म शरीराला मिळतीलच शिवाय चवबदल म्हणूनही हे सूप जरूर करून बघा. वैदेही भावे यांनी चकली या ब्लॉग स्पॉटवर पालकाच्या सुपाची सोपी रेसेपी दिली आहे, ती पुढीलप्रमाणे-
साहित्य:
२ मध्यम पालक जुड्या
१ लहान कांदा, बारीक चिरून
१ लहान लसूण पाकळी, थोडीशी ठेचून
१ लहान हिरवी मिरची, उभी चिरून
१ टिस्पून बटर
चिमूटभर दालचिनीपूड / १ लहान दालचिनीची काडी
चवीपुरते मिठ
काळी मिरी
२ टेस्पून हेवी क्रिम
कृती:
१) पालक निवडून घ्यावा, पाने खुडून घ्यावीत. धुवून ब्लांच करावा. ब्लांच करण्यासाठी पालकाची खुडलेली पाने गरम पाण्यात २ मिनीटे उकळावीत. गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात घालावीत. सर्व पाणी काढून टाकून मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यावी.
२) जर आख्खी दालचिनी असेल तर १ टिस्पून बटरमध्ये दालचिनीची काडी घालून थोडावेळ परतावे.
३) लसूण आणि हिरवी मिरची घालून साधारण ३० सेकंद परतावे. बारीक चिरलेला कांदा घालून गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतावा.
४) पालकाची प्युरी घालून उकळी काढावी. चवीपुरते मिठ घालावे. जर आख्खी दालचिनी सुरूवातीला घातली नसेल तर थोडी दालचिनीपूड घातली तरी चालते, ती आत्ता घालावी.
थोडी मिरपूड भुरभूरावी आणि थोडे हेवी क्रिम घालून सूप सर्व्ह करावे.
टीप:
१) जर सूपला छान क्रिमी टेस्ट आणि टेक्स्चर हवे असेल तर पालकची प्युरी करताना मिक्सरमध्ये १/२ कप दूध किंवा १/४ कप हेवी क्रिम घालावे म्हणजे सूप उकळताना दुध फुटणार नाही
२) सूपला घट्टपणा येण्यासाठी १ चमचा तांदूळ पिठ किंवा मैदा थोड्या पाण्यात मिक्स करून सूपमध्ये घालून सूप थोडावेळ उकळावे.