मासिक पाळीदरम्यान 'या' पदार्थांचा आहारात समावेश करणं ठरतं फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 04:54 PM2018-10-22T16:54:22+5:302018-10-22T16:55:16+5:30
आजही मासिक पाळी हा विषय खुलेपणाने न बोलता येणाऱ्या विषयांमध्ये मोडतो. प्रत्येक महिन्याला स्त्रियांना येणारी ही मासिक पाळी म्हणजे एक नैसर्गिक चक्र असतं.
(Image Creadit : HealthyWomen)
आजही मासिक पाळी हा विषय खुलेपणाने न बोलता येणाऱ्या विषयांमध्ये मोडतो. प्रत्येक महिन्याला स्त्रियांना येणारी ही मासिक पाळी म्हणजे एक नैसर्गिक चक्र असतं. त्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काहीच नसतं. या दिवसांमध्ये स्त्रियांना आपली जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या आहाराकडेही नीट लक्ष देणं गरजेचं असतं. मासिकपाळीदरम्यान महिलांना थकवा, सुस्ती येणं यांसारख्या अनक तक्रारींचा सामना करावा लागतो. काही महिलांना हे सर्व सहन करणं फार कठिण जातं. त्यामुळे त्यांची चिडचिड होऊ लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं. व्यवस्थित डाएट फॉलो केल्याने वेदना कमी होतात.
कलिंगड :
मासिक पाळीदरम्यान आहारामध्ये कलिंगड, दही, संत्री यांसारख्या पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. कलिंगडामध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचे प्रमाण आढळते. त्यामुळे याचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची मात्रा वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते.
दही :
दह्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम आढळते. शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअम फायदेशीर ठरते. मासिक पाळीदरम्यान दही खाल्याने शरीरामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण बॅलेन्स करणं शक्य होतं.
डार्क चॉकलेट :
मासिक पाळीदरम्यान डार्क चॉकलेट खाणं फायदेशीर ठरतं. हे शरीरातील अॅन्टी-ऑक्सिडंट सेरोटोनिन वाढवतं. त्यामुळे तुमचा मूड शांत राहण्यास मदत होते.
ओमेगा ३ फॅटी अॅसिड :
बांगडा, सार्डिन्स, ट्यूना यांसारखे मासे त्याचप्रमाणे अक्रोड, पिस्ता, तीळ, जवस यांचा आहारामध्ये समावेश केल्याने या दिवसांत शरीरातील ओमेगा ३ फॅटी अॅसिडची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
ड्रायफ्रुट्स :
शेंगदाणे, अक्रोड, बदाम, काजू या सुकामेव्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन्स असतात. मॅग्नेशिअममुळे मेंदूतील भावनाशी संबंधित घटकाचं नियमन होतं. त्यामुळे आपला मूड फ्रेश आणि आनंदी राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील अॅसिडिटीचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते.
फ्लॉवर, कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट, पालक, शेंगभाज्या, सोयाबीन यांसारख्या भाज्या आणि स्ट्रॉबेरी, रासबेरी आदींच्या सेवनाने सूज कमी होणे, रक्तप्रवाह वाढणे आणि वेदना शमविण्यास मदत करते.
याव्यतिरिक्त मासिक पाळी दरम्यान व्हिटॅमिन आणि आर्यन युक्त पदार्थांचा जास्तीत जास्त आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे कॅफेन आणि अॅसिडिक पदार्थांचं सेवन करणं टाळावं. मासिक पाळीमध्ये कॉफी प्यायल्याने पोटामध्ये अॅसिडची मात्रा वाढते ज्यामुळे आणखी वेदना होतात.