कशाला खाता हे पदार्थ? - पावसाळ्यात प्रकृती सांभाळायची तर या गोष्टी टाळाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 03:51 PM2017-07-29T15:51:13+5:302017-07-29T15:53:37+5:30
या काळात अरबट चरबट खाल्लं तर तब्येतीच्या कुरबुरी सुरू होणारच.
- मयूर पठाडे
एरवी कसे आपण ‘फिट्ट’ असतो, म्हणजे फारशी काळजी घेतली नाही, तरी आपण लगेच आजारी पडतो असं नाही, पण हाच नियम पावसाळ्याला लावता येत नाही. येताजाता अरबट चरबट काहीही खाल्लं तर तुमच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू होणारच.
त्यामुळे पावसाळ्यात तुम्हाला काहीही खाता येत नाही. नाहीतर हमखास आजारी पडलात म्हणून समजा. त्यासाठी खाण्यापिण्याची योग्य काळजी तर घेतली पाहिजेच, पण त्यापेक्षाही काय खाऊ नये हेदेखील तुम्ही पाहिलं पाहिजे.
पावसाळ्यात काय खाऊ नये?
१- पालेभाज्या-
एरवी पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम, पण पावसाळ्यात तुमची पचनशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे पावसाळ्यात पालेभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
२- हातगाड्यांवरचा ज्यूस
ज्यूस सगळ्यांनाच आवडतो. त्यातही फळांचा ज्यूस आरोग्यासाठी चांगला असंही सगळ्यांचं म्हणणं असतं, पण हातगाड्यांवरील ज्यूसमधील बॅक्टेरिया तुमची नक्कीच वाट लावू शकते.
३- सी फूड
पावसाळ्यात समुद्री माशांसारखा आहार कमीत कमी घ्यावा.
४- हातगाड्यांवरील पदार्थ/चायनीज-
चायनिज पदार्थांचं आजकाल खूपच फॅड आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सारेच चायनीज फूडवर तुटून पडतात. पण उघड्यावरचे हे पदार्थ तुमची पचनशक्ती तर बिघडवतातच, पण वेगवेगळ्या आजारांनाही तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.
५- न शिजवलेलं अन्न
अनेकांना जेवताना सॅलड वगैरे कच्चे पदार्थ खाण्याची सवय असते, पण पावसाळ्याच्या दिवसांत हे कच्चे पदार्थ खाणं कमी केलं पाहिजे. कच्चे पदार्थ खाण्यासाठी खूपच जड असतात. त्यामुळे तसे ते खाल्लयास तुम्हाला पोटाचे विकार जडू शकतात.
६- तेलकट पदार्थ-
पावसाळा आणि भजी पावसाळा आणि गरमागरम पकोडे, तेलकट पदार्थ याचंही अतूट असं नातं आहे. समोर पाऊस पडत असताना असे पदार्थ चाखायला कोणालाही आवडतातच, पण त्यामुळे तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार हे नक्की.