भय इथले संपत नाही! 'या' देशात पसरली कोरोनाची दुसरी लाट, लागू केली आणीबाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 12:31 PM2020-10-15T12:31:38+5:302020-10-15T13:10:01+5:30
CoronaVirus News & latest Updates : फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसने गेल्या अनेक महिन्यापासून थैमान घातलं आहे. आता हळूहळू कोरोनाचा प्रसार कमी होत आहे. तर अनेक ठिकाणी रुग्णांची आणि कोरोनामुळे होत असलेल्या मृतांची संख्याही कमी झालेली आढळून आली आहे. तर काही देशांमध्ये कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. फ्रान्समध्ये आता कोरोनाची दुसरी लाट पसरायला सुरूवात झाली आहे. या लाटेचा फटका जास्तीत जास्त लोकसंख्येला बसू नये यासाठी फ्रेंच सरकारने देशात आणीबाणी लागू केली आहे. फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
France declares public health state of emergency over #COVID19: Reuters
— ANI (@ANI) October 14, 2020
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या आपत्कालीन आणीबाणीमुळे फ्रेंच सरकारला कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर कठोर उपाययोजना करण्याचे अधिकारही असू शकतात. फ्रान्सने याआधीही कोरोनाचा वाढणारा प्रसार रोखण्यासाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्याअंतर्गत सरकारने कोरोना संक्रमणाविरूद्ध लोकांवर कडक निर्बंध घातले होते. यादरम्यान लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मार्चमध्ये सुरू झालेली ही आणीबाणी जवळपास 10 जुलैपर्यंत होती.
बुधवारी माध्यमांना मुलाखत देताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, ''सध्याच्या स्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे अनिवार्य आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले पाहिजेत.'' याशिवाय पॅरिसमध्ये आणि कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कर्फ्यूची घोषणा केली आहे. मॅक्रॉन यांनी शनिवारपासून 9 शहरांमधील रहिवासीयांना रात्री 9 ते पहाटे 4 या वेळेत त्यांच्या घरी रहावे, असे आवाहन केले आहे. CoronaVirus : हिवाळ्यात कोरोना विषाणूचा धोका वाढणार? सुपर कम्प्यूटरने केला खुलासा
पुढे त्यांनी सांगितले की, '' सावधगिरी म्हणून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ले-डे-फ्रान्स प्रदेश तसेच लिल, ग्रेनोबल, लियोन, मार्सिले, रुएन, सेंट एटिने, माँटपेलियर आणि टूलूझ या शहरामध्ये कर्फ्यू लागू होईल, यावर त्यांनी भर दिला. दरम्यान, बुधवारी फ्रान्समध्ये कोरोनाचे 22,951 नवीन रुग्ण आढळले. फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 32 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संक्रमितांची संख्या 7 लाख 56 हजार 472 आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा होणार? महाराष्ट्रातील 'या' शहरात Reinfection चे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली