हाताच्या तळव्यांना वारंवार घाम येतोय? 'या' आजाराची शक्यता असू शकते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 12:30 PM2023-06-21T12:30:36+5:302023-06-21T12:30:49+5:30
हात आणि पायांच्या तळव्यांना घाम येणे योग्य नाही. या अशा व्यक्तिंना मानसिक आजार, ताणतणाव असण्याचे प्राथ
मुंबई : काही व्यक्तिंना कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल न करता हातांच्या किंवा पायांच्या तळव्यांना घाम येतो. विशेष म्हणजे हा घाम पुसल्याने तो काही थांबत नाही. त्या व्यक्तीच्या तळव्यांना वारंवार घाम येतो. मात्र, या व्यक्तिंना काही आरोग्याच्या समस्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घाम येणे थांबत नसेल तर त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. काही लक्षणांमुळे हा घाम येत असेल तर त्यावर उपचार करून हा घाम थांबविणे शक्य असते. कारण, कुठल्याही आरोग्याच्या समस्यांशिवाय हा घाम येत असेल तर त्या व्यक्तिला हायपरहायड्रोसिस या आजाराची समस्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वारंवार घाम येणे योग्य नव्हे
हात आणि पायांच्या तळव्यांना घाम येणे योग्य नाही. या अशा व्यक्तिंना मानसिक आजार, ताणतणाव असण्याचे प्राथमिक कारण असते. काही वेळा मधुमेह, थायरॉईडमुळेही वारंवार घाम येतो.
काय काळजी घ्याल?
समस्या गंभीर असेल तर वैद्यकीय सल्ला घेऊन रक्ताच्या काही चाचण्या करून घेणे आवश्यक ठरते. हायपरहायड्रोसिसचे निदान केले असेल तर शरीरातील ग्रंथी अधिक सक्रिय होतात.
...हा तर हायपरहायड्रोसिस आजार
काही व्यक्तिंना आरोग्याच्या कोणत्याही व्याधी नसतात. तरीही त्यांच्या तळव्यांना घाम सातत्याने येतो. तीनही ऋतूत त्यांना हा त्रास होतो. अशावेळी वैद्यकीय सल्ल्याने या आजाराचे निदान करून घ्यावे. त्यामुळे काही वेळा हायपरहायड्रोसिस आजार असण्याची शक्यता असते. यामध्ये काहीवेळा रक्तवाहिन्या अधिक सक्रिय होतात.
हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना घाम येण्याची विविध कारणे असू शकतात. हायपरहायड्रोसिस नावाचा आजार असू शकतो. मात्र, त्याचे योग्य निदान डॉक्टरांकडून करून घेणे अपेक्षित असते. काही वेळा मानसिक ताणतणावमुळेही अशा पद्धतीची लक्षणे दिसू शकतात. काहीवेळा मधुमेह, थायरॉइडमुळेसुद्धा हे आजार होऊ शकतात. शरीरातील ग्रंथी अतिक्रियाशील होतात, त्यावेळी असा त्रास होतो. या अशावेळी अतिक्रियाशील ग्रंथी सर्जरी करून हे थांबविता येते.
- डॉ. विनायक सावर्डेकर, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यक शास्त्र, सेंट जॉर्जेस रुग्णालय