थंडीची मजा औरच, पण काळजीही घ्यायलाच हवी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 04:12 PM2018-01-13T16:12:36+5:302018-01-13T16:13:17+5:30
‘विंटर सेट’वरचा खर्च आवश्यकच!
- मयूर पठाडे
या थंडीचा खरंच काही भरवसा नाही.. किती वाढावी थंडी? ती आपली रोज वाढतेच.. आज कमी होईल, उद्या कमी होईल असं आपल्याला भले कितीही वाटू देत, पण हवामान खातं दर दोन-चार दिवसांनी सांगतंच, ‘महाराष्टÑात येत्या दोन दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार!’..
आताही बघा, पार संक्रांत आली, तरीही थंडी आपली कमी व्हायला काही तयारच नाही! म्हणजे आता ती थोडी कमी झालीय, पण आणखी वाढणारच नाही, असंही काही सांगता येत नाही..
थंडीची अनोखी मजाही असतेच. इतर ऋतूत ही मजा अनुभवता येत नाही. थंडीत उशीरापर्यंत गोधडीत लोळत पडायला तसं छानच वाटतं, पण नुसतं वाटून काय उपयोग? तुम्हाला रोज शाळा, कॉलेजांत जायचंच आहे, सकाळी लवकर उठायचंच आहे, अभ्यास, होमवर्क तर काही चुकत नाही. खेळाडूंनाही सकाळी लवकर उठावंच लागतं. थंडीत व्यायाम करायचं तुम्ही मनावर घेतलं असलंत तर गोधडी दूर फेकून कुडकुडत बाहेर पडावंच लागतं..
अर्थात काही जण ऐटीत सांगतातही, ह्यॅ, ही काय थंडी आहे? अजून खरी थंडी तर पडायचीच आहे.. मी बघा कसं, कोणतेही गरम कपडे न घालता कसं बाहेर पडतोय ते! अर्थात बºयाचदा ते अर्धसत्य असतं. कारण त्यालाही थंडी वाजतच असते, पण मोठेपणा मिरवण्याचा हा शो ते आनंदानं खेळत असले तरी त्याचा व्हायचा तो परिणाम होतोच !
डॉक्टरांचं म्हणणं आहे, थंडी कमी वाजत असली, वाटत असली तरी थंडीत गरम कपडे तुम्ही वापरलेच पाहिजेत. आपलं कान, डोकं, पाय, शरीर योग्य पद्धतीनं झाकलंच पाहिजे. ‘विंटर सेट’वर केलेला खर्च हा अंतिमत: खूपच फायद्याचा असतो. कारणाशिवाय उगाच आपलं शरीर फार उघडं ठेऊन फिरू नये. कारण आपल्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता त्यामुळे विनाकारण वाया जाते.
तुम्ही अगदी कितीही मोठे स्पोर्ट्समन असलात, मैदानावर जाऊन घाम गाळत असला, तरी थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे. थंडीत त्वचा कोरडी पडते. याकडेही कटाक्षानं लक्ष द्यायला हवं, नाहीतर आपल्या त्वचेचीही वाट लागू शकते..