भन्नाट शोध! आता सुईशिवाय दिली जाणार लस; दुखणार तर नाहीच, नर्सचीही गरज नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 09:34 PM2021-09-28T21:34:08+5:302021-09-28T21:35:40+5:30
सुईचा फोबिया असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार; सुईशिवाय लस दिली जाणार
नवी दिल्ली: भविष्यात इंजेक्शनच्या माध्यमातून होणाऱ्या वेदनांपासून सुटका होऊ शकते. लवकरच सुईशिवाय लस देता येईल. विशेष म्हणजे हे इंजेक्शन आताच्या इंजेक्शनपेक्षा अधिक प्रभावी असेल. अनेकांना लस, औषधं घ्यायचं असतं. मात्र त्यांच्या मनात सुईबद्दल भीती असते. सुई टोचल्यामुळे होणारी वेदना त्यांना नको असते. त्यासाठी आता सुईशिवाय इंजेक्शन देण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान आता एका निर्णायक टप्प्यावर आहे.
शास्त्रज्ञांनी एक लहानशी थ्रीडी प्रिंटेड मायक्रोनेडल लस विकसित केली आहे. ही लस भविष्यात सुईला पर्याय ठरेल. कॅलिफॉर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठानं यावर संशोधन केलं आहे. या तंत्रज्ञानाची उंदरांवर चाचणी घेण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरानंतर रोगप्रतिकाशक्तीवर दिसून आलेला प्रभाव इंजेक्शनच्या तुलनेत १० पटीनं अधिक आहे. टीसी आणि अँटिजन स्पेसिफिक अँटीबॉडीच्या बाबतीत हाच प्रभाव ५० पटीनं जास्त आढळून आला.
डॉक्टर, नर्सची गरज नाही
थ्रीडी प्रिंटेड मायक्रोनेडल लस देण्यासाठी नर्स किंवा डॉक्टरांची गरज भासणार नाही. गरज असेल तेव्हा कोणतीही व्यक्ती अतिशय सहजपणे ही लस घेऊ शकेल. सुईच्या तुलनेत वेदना कमी असेल. एका लहानशा पॅच स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या या लसीमध्ये डोसची आवश्यकता कमी असेल. सुईची भीती असलेल्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा होईल. उंदरांवर या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी झाली असली, तरी अद्याप माणसांवरील चाचणी शिल्लक आहे.
लस कशी काम करणार?
पॉलिमर मायक्रोनेडल व्हॅक्सिन पॅच एका क्लिप प्रोटोटाईप थ्रीडी प्रिंटरच्या मदतीनं प्रिंट केली जाते. मायक्रोनेडल्सला व्हॅक्सीन फ्लूडसोबतही कोट केलं जातं. लस शरीरात गेल्यानंतर फ्लूड विरघळून जाईल. या लसीच्या माध्यमातून औषध मांसपेशीपर्यंतही पोहोचवता येतं.