‘गालगुंड’ का होते? अशा वेळेस लहान मुलांची कशी काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:28 AM2023-12-29T10:28:54+5:302023-12-29T10:33:19+5:30
गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील इतर भागांत गालगुंडचे रुग्ण पाहावयास मिळत आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील इतर भागांत गालगुंडचे रुग्ण पाहावयास मिळत आहेत. हा आजार विषाणू संसर्गाने होत असल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात दरवर्षी या रुग्णांचे प्रमाण दिसत असते. विशेष करून लहान मुलांमध्ये हा आजार दिसत असून, यामुळे लहान मुलांना अन्न गिळण्यास त्रास होतो.
मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. त्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा आजार होऊ नये म्हणून लहानपणीच गोवर, गालगुंड आणि रुबेलाच्या लसी लहान मुलांना दिल्या जातात. मुंबई पालिका एकमेव पालिका आहे ज्या ठिकाणी या तिन्ही लसी मोफत दिल्या जातात. मात्र, तरीही काही प्रमाणात मुंबई शहरात या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. लसीकरणामुळे या आजाराला प्रतिबंध घालता येणे शक्य झाले आहे.
काय आहे गालगुंड?
अन्नाचे पचन होण्यासाठी ज्या विशिष्ट लाळग्रंथीमधून लाळ मिसळली जाते, त्या पॅराटिड ग्लॅन्डला विषाणू संसर्गामुळे सूज येते. ही ग्रंथी कानाच्या खालच्या बाजूस असते. ही ग्रंथी सुजल्यामुळे अन्न खाताना त्रास होऊन खूप वेदना होतात. यामुळे गाल फुगतो, तोंड उघडण्यास त्रास होतो.
यामुळे ताप येतो. डोके आणि कान दुखतात. काही वेळेला ही सूज गालाच्या एका बाजूस येते. जर या आजारावर वेळेतच उपचार केले नाहीत, तर त्याचा परिणाम मेंदूवर होण्याची शक्यता असते, तर काही वेळा बहिरेपणासुद्धा येऊ शकतो.
वेळेवर लस घेणे गरजेचे :
गोवर, गालगुंड आणि रुबेलाचे लसीकरण मुलांमध्ये करण्यात येते. मुंबईत महापालिकेतर्फे या लसी मोफत देण्यात येतात. बाळाच्या जन्मानंतर नवव्या महिन्यात आणि दुसरा डोस १६ व्या महिन्यात देतात. त्यामुळे गालगुंडसारखे आजार होत नाहीत. त्यामुळे मुलांचे वेळेवर लसीकरण करून घेतले पाहिजे.