गणपतीबाप्पा तब्येत सांभाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 02:57 AM2017-08-17T02:57:56+5:302017-08-17T02:57:59+5:30
आला पावसाळा, तब्येत सांभाळा असे लेख वाचून झाले असतीलच.
- डॉ. नितीन पाटणकर, मधुमेहतज्ज्ञ
आला पावसाळा, तब्येत सांभाळा असे लेख वाचून झाले असतीलच. पुढे पावसाळाऐवजी ‘हिवाळा’ हा ऋतुबदल. बाकी लेखाचा ढंग तोच. मुंबईत पण हिवाळा येतो, हे असे लेख वाचल्याशिवाय कळत नाही. असे लेख यायला लागले की मुंबईतले लोक वुलनचे पडून राहिलेले कपडे बाहेर काढतात. त्याला लागलेला ‘डांबराच्या गोळ्यांचा’ वास उडून जायच्या आत हिवाळा उडून गेलेला असतो. या ऋतूंपेक्षा जास्त काळजी घ्यायला हवी ती सणांच्या काळात. नारळी पौर्णिमेपासून ते दिवाळी संपेपर्यंत आपण सणात असतो. आता गणपती येतील.
गणपती भक्तीला उधाण येईल. जोरजोरात आरत्या म्हणून झाल्या की मग ‘यज्ञेन यज्ञ... चालू होईल. पट्टीचा गायक किंवा खेळाडू यांना लाजवेल इतकी दमछास असलेले लोक ‘विश्वे देऽऽऽ’ला इतका लांबलचक ‘आ’ लावतात की भूक लागते. मग प्रसाद खायचा, ताजेतवाने व्हायचे आणि पुढच्या घरी जायचे.
इथेच मधुमेह असलेल्यांची पंचाईत होते. प्रसाद खावाच लागतो.
सत्यनारायणाच्या पूजेसारखा इथे काही दम भरलेला नसतो कुणी ‘प्रसाद घेतला नाही म्हणून गणपती चिडल्याचे ऐकिवात नाही.’ तरीपण प्रसादाला नाही म्हटले म्हणजे काहीतरी चुकल्यासारखे वाटत राहते.
पूर्वी प्रसाद म्हणून साखर असायची, फळांचे तुकडे असायचे. बरेचदा तर नुसता केळीचा तुकडा असायचा.
हल्ली प्रसाद म्हणून चिकट झालेले खव्याचे मोदक असतात. त्यापुढे जाऊन हल्ली जितका श्रीमंती स्निग्धतेने भरलेला प्रसाद असेल त्या प्रमाणात गणपती पण सुखावतो अशी समजूत असावी.
प्रश्न असतो तो मधुमेह झालेल्यांचा. त्यांना कोणी सांगतो, प्रसाद कितीही खाल्ला तरी साखर वाढत नाही कारण ‘देवाक काळजी’ असते. कोणी म्हणतो, प्रसाद घेतला नाही तर शास्त्र सांगते की ‘पाप’ लागते. खाल्ला तर पुण्य मिळते.
माझ्याकडे मधुमेहासाठी उपचार घेणाºया अनेकांची साखर या सणासुदीच्या दिवसात खूप वाढते. त्यातून एक सिद्ध होते की ‘आहाराची शिस्त पाळली नाही तर देवसुद्धा मदतीला येत नाही.’
दुसरा मुद्दा हा शास्त्र काय सांगते हा आहे. मी जे काही वाचन केले त्यामध्ये मला दोन महत्त्वाचे शब्द सापडले. प्रसाद ग्रहण आणि प्रसाद भक्षण. शोडषोपचारे पूजेनंतर अन्नात देवत्त्वाचा अंश येतो. तो आपण श्रद्धेने ग्रहण केला म्हंणजे स्वीकारला (खाल्ला नाही) की, त्या देवत्वाचा अंश आपल्यात उतरतो आणि हाती पुन्हा मूळ अन्न उरते. हे अन्न इतर अन्नासमान असते. ते भक्षण केले काय किंवा नाही केले काय, त्यामुळे पापपुण्याच्या स्टॉकमध्ये काही फरक पडत नाही.
काही ठिकाणी असेही वाचले की, हे अन्न गरजूंना दिले तर प्रसाद ग्रहणाच्या पुण्यासोबत अन्नदानाचे पुण्य पण मिळते. तेव्हा उगाच गणपती किंवा देवाच्या नावे प्रसाद खाऊन, तब्येत बिघडवून देवाला कशाला बदनाम करायचे? पण लोक प्रसाद चापणार, त्याचे परिणाम देवाला भोगायला लागणार.
म्हणूनच देवाला सल्ला : तब्येत सांभाळा!
drpatankarnitin@gmail.com