गरबा खेळताना हार्ट अटॅकने का होताहेत मृत्यू?; तज्ज्ञांनी सांगितलं कारण, करू नका 'या' चुका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 12:36 PM2023-10-23T12:36:19+5:302023-10-23T12:43:13+5:30
गरबा खेळताना प्रकृती बिघडल्याने देशातील प्रमुख शहरांमधील विविध रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
देशात नवरात्रौत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. विविध शहरांमध्ये ठिकठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा खेळण्यासाठी तसेच त्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईसह आबालवृद्धही हिरिरीने सहभागी होत आहे, मात्र गुजरातमध्ये गरबा खेळताना हार्ट अटॅकने अवघ्या 24 तासांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे गरबा खेळताना प्रकृती बिघडल्याने देशातील प्रमुख शहरांमधील विविध रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
तज्ज्ञांनी या मृत्यूमागची अनेक कारणं सांगितली आहेत. गरबा इव्हेंट्सच्या वेळी मेडिकल कंडीशन, दीर्घकाळ उपवास, अनहेल्दी खाणं, हार्ट अटॅकबाबत माहिती नसणं या कारणांमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये 24 तासांत गरबा इव्हेंटमध्ये हार्ट अटॅकने किमान 10 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली, त्यापैकी 17 वर्षांचा मुलगा हा सर्वात लहान होता. अहमदाबाद, राजकोट आणि नवसारी येथेही अशीच प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही काळापासून भारतात हृदयविकार आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कोविड नंतरची गुंतागुंत, वायू प्रदूषण आणि अस्वस्थ जीवनशैली यासह अनेक घटक यासाठी जबाबदार आहेत. अहमदाबादच्या नारायणा हॉस्पिटलचे कन्सल्टंट इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. झीशान मन्सूरी यांनी सांगितलं की, "आम्ही पाहत आहोत की तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पूर्वी, 10 पैकी 1 रूग्ण 30 वर्षांपेक्षा कमी वयाचा होता, परंतु आता आम्ही 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे 10 रूग्ण पाहत आहोत."
डॉ बिमल छाजेर यांनी देखील सांगितलं की, फक्त वृद्धच नाही तर ते तरुण आणि मध्यमवयीन लोक पाहत आहेत जे विविध लक्षणांसह ओपीडीमध्ये येत आहेत. एम्सचे माजी सल्लागार छाजेर यांनी सांगितलं की, पूर्वी येणाऱ्या 10 टक्के रुग्णांमध्ये अत्यंत गंभीर लक्षणे, ब्लॉकेज आणि कार्डियाक अरेस्ट किंवा कार्डियाक स्ट्रेनची तक्रार होती, परंतु आता ही टक्केवारी सुमारे 25 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.