तणावमुक्त व्हा अन् निरोगी रहा !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 12:20 AM2018-10-29T00:20:52+5:302018-10-29T00:21:30+5:30

मानसिक ताणावर चांगल्या रीतीने इलाज आपण स्वत:च करू शकतो. त्यामुळे मन शांत ठेवून अशांत परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेवणं, आत्मविश्वास असणं महत्त्वाचं आहे.

Get stressed and be healthy! | तणावमुक्त व्हा अन् निरोगी रहा !

तणावमुक्त व्हा अन् निरोगी रहा !

googlenewsNext

- डॉ. स्वाती गाडगीळ

त्वचाविकार म्हटले की अनेकांना न्यूनगंड निर्माण होतो, नैराश्य येते, लोकांना टाळण्याची वृत्ती होते. मुख्य म्हणजे मानसिक संतुलन बिघडतं, यामुळे असलेले आजार शरीरात मूळ धरू लागतात. औषधोपचारांनी या आजारांची लक्षणे नाहीशी होतात. मात्र, ते पूर्णपणे बरे होत नाही. मानसिक ताणावर चांगल्या रीतीने इलाज आपण स्वत:च करू शकतो. त्यामुळे मन शांत ठेवून अशांत परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेवणं, आत्मविश्वास असणं महत्त्वाचं आहे. चेहऱ्यावर नुसते हसू न ठेवता त्यातील शांतता खºया अर्थाने मनात झिरपू दिली, तर सर्वच आजार समूळ नष्ट होतील.

रात्रीचे २ वाजले होते. फोनच्या रिंगने मी दचकून जागी झाले. आरएमओ डॉक्टर घाईघाईने बोलत होती. मला म्हणाली, ‘मॅडम, तुम्हाला लगेचच यायला जमेल का? एक आपलाच जुना पेशंट आहे. त्याला आॅपरेशनला घ्यावं लागणार आहे, लगेच. अल्सर फुटला आहे पोटात. पण, एक प्रॉब्लेम आहे. त्याला सोरायसिस आहे आणि परवाच जास्त त्रास होतोय, म्हणून आला होता. शिवाय, त्याने आपली औषधं बंद करून कुठूनतरी जडीबुटीवाली औषधं घेतली होती. आतासुद्धा त्याच्या अंगावर खूप जखमा आहेत. खाजवूनखाजवून रक्त येतंय, अनेक ठिकाणी. पण, तुम्ही याल ना? हाय रिस्क कन्सेंट घेतली आहे.’ मी हो म्हटलं आणि तडक निघाले. काहीही असलं तरी आॅपरेशन तर करावं लागणार होतं.

मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले, तर बाहेरच नातेवाइकांची गर्दी. चिंतातुर चेहरे, रडवेली बायको. मी वॉर्डमध्ये गेले आणि पेशंट तपासला. ईसीजी, एक्स रे, रक्ताच्या तपासण्या करत होते. एकेक रिपोर्ट येत होते. एकीकडे आॅपरेशन थिएटरमध्ये तयारी सुरू होती. मी त्याच्या हातावर कुठे सलाइन लावता येईल, ते बघत होते. सुदैवाने एका ठिकाणी सुई लावता आली. सुई नीट फिक्स केली आणि सलाइन चालू केले. मीच सांगितलं होतं की, मी लगेचच येतेय आणि तोपर्यंत कुणीही त्याला सुई लावण्याचा प्रयत्न करू नये. कारण, एखादंदुसरंच ठिकाण मिळणार होतं, जिथे नीट सलाइन सुरू करता येईल. सेंट्रललाइन हा पर्याय असतोच, पण लगेचच मानेतून सुई घालण्याची गरज वाटली नाही. माझ्या मनात निरनिराळ्या गोष्टींचा विचार होता. सोरायसिसमुळे होणारा आर्थ्रयटीस, हृदयाचे विकार, लिव्हरचे आजार, फुफ्फुसाचा व चामडीचा कर्करोग आणि सगळ्यात जास्त धोका मधुमेह व ब्लडप्रेशर असण्याचा, ज्यामुळे मला भूल देताना सावध राहावं लागणार होतं. सगळी सावधानता बाळगून त्याची शस्त्रक्रि या सुखरूप पार पडली. त्याला अतिदक्षता विभागात हलवून मी बाहेर पडले. सकाळचे साडेपाच वाजले होते. आज खूप वर्षांनी सोरायसिसचा इतका तीव्र प्रकार पाहिला.

मला अजूनही तो दिवस विसरता येत नाही. जेव्हा जे.जे. रुग्णालयात माझं पोस्टिंग स्किन डिपार्टमेंटमध्ये सुरू होतं. ओपीडी विभागात आमची सगळी टीम हजर होती. सिनिअर प्रोफेसर आम्हाला निरनिराळे चामडीचे आजार समजावून सांगत होते. बरेच रुग्ण तपासून जात होते आणि अचानक एक मध्यमवयीन माणूस जोरजोरात रडत जवळजवळ धावतच आत आला आणि म्हणू लागला, ‘मला वाचवा डॉक्टरसाहेब, नाहीतर मारून तरी टाका.’ त्याचा सोरायसिस खूप वाढला होता. एक इंचसुद्धा चामडी नीट नव्हती. सगळ्या अंगावर मोठमोठे लाल चट्टे होते. काही फोड होते आणि जखमांमधून रक्तही येत होतं. मी तर पार भेदरून गेले. पहिल्यांदाच असा रुग्ण पाहिला होता. तेव्हा मनाशी खूणगाठ बांधली की, आपण डॉक्टर झाल्यावर औषधांच्या बरोबरीने पेशंटला मानसिक आधार द्यायचा. याच विभागात एचआयव्हीचाही एक कक्ष होता. पण, एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की, तिथे मानसिक आरोग्य तपासण्यासाठी व समुपदेशनासाठी एक खास वेगळा कक्ष होता.

अन्य वैद्यकीय ओपीडींमध्ये या कक्षाची तेवढी गरज नसते, जेवढी स्किनच्या ओपीडीमध्ये असते. याचं कारण असं आहे की, हे जणू एक दुष्टचक्र च आहे. चामडीचा रोग झाला की, मानसिक संतुलन बिघडतं. एक प्रकारचा न्यूनगंड येतो, नैराश्य येतं. लोकांना टाळण्याची वृत्ती होते. याची दुसरी बाजू अशी आहे आणि जी मला जास्त महत्त्वाची वाटते, ती म्हणजे मानसिक आरोग्य बिघडलं की, हे आजार शरीरात मूळ धरतात. मी शिकत असताना या अशा सगळ्या आजारांचं कारण ‘इडियोपॅथिक’ असं सांगितलं जायचं.

आपला पहिला प्रश्न असतो की, अमुक आजार कशामुळे होतो? जीवाणू, विषाणू, नाहीतर कोलेस्टेरॉल, औषधांचा ओव्हर डोस किंवा रिअ‍ॅक्शन, आनुवंशिकता आणि बरंच काही असू शकतं. पण, एखादा आजार का होतो, त्याचं कारण जेव्हा सापडत नाही, तेव्हा त्याला इडियोपॅथिक म्हणतात. तुम्ही त्याला काहीही म्हटलं तरी हा प्रश्न मनात राहतोच की, का झाला हा आजार? त्यावर निरनिराळे उपाय करता येतात, जेणेकरून आजार थोडा आटोक्यात ठेवता येतो. पण, पूर्णपणे इलाज होऊ शकतो का, या प्रश्नाचं खात्रीने उत्तर कुणीच देऊ शकत नाही.

सोरायसिससारखे अन्य आॅटोइम्यून आजार जे सर्वसामान्यपणे दिसतात, ते आहेत संधिवात, कोड, अ‍ॅलोपेशिया एरियाटा अर्थात केसांचे गुच्छ गळून पडणे आणि पॅचेसमध्ये टक्कल पडणे, लायकेन प्लॅनस, एसएलई, इत्यादी. आॅटोइम्यून म्हणजे आपल्या शरीरातील पेशींना नष्ट करणाºया पेशी आपल्याच शरीरात तयार होतात. इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती. पण, जेव्हा ही शक्ती आपल्याच शरीरातील पेशींना विरोध करू लागते व शरीरातील निरनिराळ्या अवयवांचं नुकसान करू लागते, तेव्हा त्या आजारांना आॅटोइम्यून आजार म्हणतात. मग, आता याचा इलाज कसा करायचा? वरून लावायची स्टिरॉइड्सची मलमं, पोटात घ्यायच्या गोळ्या, इंजेक्शनं दिली जातात. काही प्रमाणात कॅन्सरसाठी वापरली जाणारी औषधं दिली जातात, जसे मिथोट्रेक्सेट. मग, परिणामांची वाट बघायची. क्वचित, एखाद्या पेशंटच्या शरीरामध्ये सुरू झालेली ही आॅटोइम्यून प्रक्रि या आपोआप एके दिवशी थंड पडते, जसं एखादं वादळ थांबावं आणि आजाराची लक्षणं नाहीशी होतात. पण, तो आजार आता मुळासकट बरा झाला आहे, असं म्हणता येत नाही.

या आजारांचा अभ्यास करताना मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट अशी आहे की, मानसिक तोल ढळणे, मानसिक अशांतता असणे, ज्याला आपण अगदी सहजपणे ‘स्ट्रेस’ म्हणतो, हेच सर्वात महत्त्वाचं कारण आहे. स्ट्रेस हा शारीरिक असू शकतो, जसं अतिकाम, अतिथकवा, गर्भारपण, बाळंतपण, काही महत्त्वाच्या घटकांचा शरीरात अभाव किंवा मानसिक जसं जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, परीक्षेत किंवा नोकरीत अपयश येणं, आर्थिक फटका बसणं किंवा एखादा गुन्हा घडणं असं काहीही असू शकतं. मग, मी विचार करू लागले की, जर मानसिक ताण हेच मुख्य कारण असेल, तर त्याचा इलाज सगळ्यात चांगल्या रीतीने कोण करू शकेल, तर ती व्यक्ती स्वत:च! थोडक्यात, काय तर कोणत्या घटनेचा किंवा परिस्थितीचा त्रास होतोय, ते ओळखून त्यावरचा इलाज शोधणे. स्वत:ला होणाºया त्रासाचा इलाज स्वत:च शोधायचा. फार कठीण नाही. कुणा तांत्रिकमांत्रिकाची नक्कीच गरज नसते किंवा लगेचच मानसोपचारतज्ज्ञांकडेसुद्धा धाव घ्यायची आवश्यकता नसते. गरज असते स्वत:ची दुखरी नस स्वत: ओळखण्याची आणि एकदा का कारण लक्षात आलं की, त्यावरचा मार्ग आपल्यापेक्षा चांगला दुसरं कुणीही शोधू शकत नाही.

मुद्दा एकच असतो, तो म्हणजे मन शांत असणं. अशांत परिस्थितीपासून स्वत:ला दूर नेणं, हवा पालट करणं, न बदलता येणारी परिस्थिती मनापासून स्वीकारणं आणि नुसतं चेहºयावर हसू न ठेवता, ती स्मितहास्यातली शांतता खºया अर्थाने मनात झिरपू देणं. लांब श्वास घेऊन स्वत:ला आश्वस्त करणं, आत्मविश्वास जपणं. जगण्याची जिद्द ज्याला जोपासता आली, तो खरा आयुष्य जगला, असं म्हणता येईल. जग सुंदर आहे आणि ते अजून सुंदर बनवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे, हे विसरून चालणार नाही.
 

Web Title: Get stressed and be healthy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य