अन्नपदार्थांना द्या मुलांचं प्रेम..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:50 PM2017-10-28T16:50:48+5:302017-10-28T16:53:25+5:30
तीही तुमचं आयुष्य समृद्ध करतील..
- मयूर पठाडे
रोज आपण जेवण करतो. अगदी रोज. उपासतापासाच्या दिवशीचं जाऊ द्या, पण दिवसांतून किमान दोनदा आपण जेवण करतो. त्याशिवाय बºयाचदा नाश्ता किंवा इतर वेळीही आपण काही ना काही तोंडात टाकत असतो.
आपल्या लक्षात येते किंवा लक्षात राहाते ती केवळ त्या त्या पदार्थाची चव. पण हा पदार्थ आपण कधी जगला आहे?
तुम्ही म्हणाल, पदार्थ जगायचा म्हणजे काय करायचं?
काही नाही, लहान मूल, त्यातही ते तान्हं मूल असेल, तर त्याकडे आपण किती बारकाईनं लक्ष देतो. त्याला काय हवं, नको, त्याला काही होतंय काए त्याची खाण्यापिण्याची वेळ, त्याला वेळच्या वेळी द्यायच्या लस, त्याची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही, वेळच्या वेळी सारे नैसर्गिक विधि त्याला होताहेत की नाही, योग्य वेळी ते पालथं पडतंय का, रांगतंय का?.. एक ना अनेक अशा हजार गोष्टी.. मुलाबरोबरचे ते सारे क्षण आपण जगत असतो. आपल्या आनंदाचा आणि आयुष्याचा तो एक भाग असतो..
आपल्या जेवणाच्या बाबतीतही तेच आहे. म्हणजे जे पदार्थ आपण खातो, ते किती आवडीनं खातो. त्या पदार्थाचं रंग, रुप, ठेवण, त्याचा स्पर्श.. यातलं आपण काय काय अनुभवतो? खरं तर काहीच नाही. अनेकदा तर आपण समरसून त्याची चवही घेत नाही.. खाल्लंच पाहिजे म्हणून आपण अनेक गोष्टी पोटात ढकलत असतो. त्याची सवय झाली म्हणूनही अनेकदा आपण तोंडात काहीही ना काही सरकवत असतो.. पण अभ्यासकांचं म्हणणं आहे, त्या अन्नपदार्थांबरोबर तुम्हीही जगा. त्या त्या पदार्थाची चव, रंग, स्पर्श, आकार या सगळ्या गोष्टी मनापासून अनुभवा. हा अनुभव तुमचं केवळ पोषणच करणार नाही, तर एक अपूर्व असा आनंद तुम्हाला देऊन जाईल..
जे लोक अशा पद्धतीनं अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात, त्यांचं आयुष्यही तुलनेनं सुखी असतं, ताणतणावांपासून अशा व्यक्ती बºयाच दूर असतात. म्हणजे त्यांना काहीच टेन्शन्स नसतात, असं नाही, पण ही अन्नदेवता त्यांची ही सारी टेन्शन्स आपोआप कमी करते. तुलनेनं ही मंडळी उत्साही, तत्पर आणि कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरी जाणारी आणि त्यांना भिडणारी असतात, असं निरीक्षण आहे.
खरंतर आपल्या पूर्वजांनी आणि वाडवडिलांनी हेच सांगून ठेवलं आहे. आजीबाईच्या बटव्यातीलच ही गोष्ट. ती पुन्हा अनुभवायला काय हरकत आहे?