तापमानवाढीमुळे बिघडणार मानसिक आरोग्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 01:03 PM2018-10-09T13:03:01+5:302018-10-09T13:05:15+5:30
२००५ साली हरिकेन वादळ आलेल्या लोकांच्या मानसिक तक्रारींमध्ये इतर सुरक्षित जागी राहाणाऱ्या लोकांच्या तक्रारींपेक्षा ४ टक्क्यांनी वाढ झाली होती. तसेच ३० अंशांपेक्षा तापमान वाढल्यानंतर मानसिक आरोग्य बिघडण्याच्या संख्येत १ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही दिसून आले.
न्यू यॉर्क- जागतिक तापमानामध्ये जशी वाढ होत जाईल तशी मानसिक आरोग्यासंदर्भातील तक्रारींमध्ये वाढ होत जाईल अशी भीती एका अभ्यासामधून व्यक्त करण्यात आली आहे. २०१६ हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून ओळखले जाते. अमेरिकेमध्ये आजवरच्या इतिहासात सध्या मानसिक आजारांच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मॅसेच्युसेटस इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नोलजी (एमआयटी) आणि हार्वर्ड विद्यापीठाने तापमान वाढ आणि मानसिक आजार एकत्र येणे हा योगायोग नसल्याचे म्हटले आहे.
तापमानामध्ये एका अंशाने वाढ झाल्यावर मानसिक आरोग्याच्या तक्रारींमध्ये दोन टक्क्यांनी वाढ होते असा निष्कर्ष या संस्थांनी काढला आहे. पृथ्वीवरच्या प्रत्येक प्रजातीला तापमानवाढीचे परिणाम भोगावे लागत आहेत. पण मनुष्याच्या मानसिक आरोग्यावर त्याचे परिणाम होत आहेत. तापमान वाढल्यानंतर लोकांच्या मानसिक आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. उष्ण दिवसांमध्ये लोक आळसावल्याचे तसेच त्यांच्या वागण्यात अनिश्चितता आल्याचे दिसते. उष्णता वाढल्यावर अमेरिका आणि मेक्सीकोमध्ये नैराश्य व्यक्त करणाऱ्या ट्वीट्समध्ये वाढ होते तसेच आत्महत्यांमध्ये वाढ होते असे निरीक्षण स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी नोंदवले होते.
एमआयटी आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासामध्ये अमेरिकेतील २० लाख लोकांच्या मानसिक आरोग्यातील बदल व तापमान यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला तसेच जवळजवळ एका दशकभराच्या नोंदीचीही माहिती घेण्यात आली. तापमानात वाढ किती काळ झाली हे महत्त्वाचे नाही तर तापमानवाढीमुळे मानसिक आरोग्य तक्रारी लक्षणीय वाढल्या हे लक्षात आल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. २००५ साली हरिकेन वादळ आलेल्या लोकांच्या मानसिक तक्रारींमध्ये इतर सुरक्षित जागी राहाणाऱ्या लोकांच्या तक्रारींपेक्षा ४ टक्क्यांनी वाढ झाली होती. तसेच ३० अंशांपेक्षा तापमान वाढल्यानंतर मानसिक आरोग्य बिघडण्याच्या संख्येत १ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही दिसून आले. पावसामुळेही मानसिक आरोग्य वाढल्याचे दिसले. महिन्यातील २५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस पडल्यास मानसिक आरोग्य बिघडण्यामध्ये २ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.