येथे जा आणि दमा कंट्रोल करा! राज्यातील पहिले फुफ्फुस पुनर्वसन केंद्र
By स्नेहा मोरे | Published: December 14, 2022 01:06 PM2022-12-14T13:06:35+5:302022-12-14T13:06:53+5:30
सध्या मुंबईच्या बिघडलेल्या वातावरणामुळे श्वसन विकार असणाऱ्या रुग्णांना चांगलाच फटका बसला आहे. यासाठी जे जे रुग्णालयात फुफ्फुस पुनर्वसन केंद्र हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अनेकदा श्वसनाचे गंभीर आजार असणाऱ्या वा दमा असणाऱ्या रुग्णांना दीर्घकाळ औषधोपचार करावे लागतात. याखेरीज, शहरातील वायुप्रदूषण वाढल्यास किंवा वातावरणात बदल झाल्यास या रुग्णांना त्याचे अधिकचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. सध्या मुंबईच्या बिघडलेल्या वातावरणामुळे श्वसन विकार असणाऱ्या रुग्णांना चांगलाच फटका बसला आहे. यासाठी जे जे रुग्णालयात फुफ्फुस पुनर्वसन केंद्र हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
मागील दहा महिन्यांत या फुफ्फुस पुनर्वसन केंद्रात ३५० हून अधिक रुग्णांनी व्यायाम आणि समुपदेशनाद्वारे फुफ्फुसांचे आरोग्य सुदृढ राखले आहे. हे केंद्र सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी दुपारी २ ते सायंकाळी चार या वेळेत सुरू असते, अशी माहिती जे जे रुग्णालयाच्या श्वसन विकार विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती मेश्राम यांनी दिली.
समुपदेशन, व्यायाम आणि आहाराची मात्रा
या केंद्रामध्ये दमा, श्वसनाचे गंभीर आजार, पोस्ट टीबी रुग्णांना तपासले जाते, त्यासाठी विशेषज्ञांची चमू आहे. त्यात छातीविकारतज्ज्ञ, श्वसनविकारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि समुपदेशक यांचा समावेश आहे. औषधोपचारांसह रुग्णांवर या केंद्रात फिजिओथेरपी उपचार तसेच त्यांचे समुपदेशनही केले जाते. त्याचप्रमाणे, आहार तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन दिले जाते. या केंद्रात उपचार पद्धतींचा कालावधी हा आठ आठवड्यांचा आहे.
खासगी रुग्णालयात दोन-अडीच हजारांचा फटका
राज्यात शासकीय रुग्णालयात असणारे हे पहिले फुफ्फुस पुनर्वसन केंद्र आहे. खासगी रुग्णालयातही अशी केंद्रे असून येथे एकदा भेट देण्याचा खर्च हा दोन ते अडीच हजारांचा असतो. त्या तुलनेत जे जे रुग्णालयातील केंद्रात ही सेवा अत्यंत अल्प दरात उपलब्ध आहे.
पुरुषांना अधिक त्रास
मागील दहा महिन्यांत केंद्रात उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये ५५ टक्के पुरुष आणि ४५ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे.
बऱ्याचदा पुरुष श्वसनाच्या छोट्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यानंतर आजार गंभीर स्वरूप घेतो.
त्यामुळे या केंद्रात आलेल्या पुरुषांना गंभीर श्वसन विकार असल्याचे दिसून आले मात्र येथील उपचारांमुळे त्यांचा आजार बराच सुसह्य, नियंत्रित झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पोस्ट टीबी, कोविडसाठी जास्त फायदेशीर
शासकीय रुग्णालयात सर्वाधिक क्षयरोग बाधितांवर उपचार केले जातात. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ७५ ते ८० टक्के आहे.
क्षयरोगाच्या विषाणूंचा
सर्वाधिक परिणाम हा रुग्णाच्या फुफ्फुसावर होतो. त्यामुळे क्षयरोगाने ग्रस्त रुग्णांचे फुफ्फुस खराब होते.
पोस्ट टीबी प्रमाणेच पोस्ट
कोविड समस्या देखील असल्याने या ‘रिहॅबीलिटेशन सेंटर’चा फायदा कोविड रुग्णांना देखील होतो.
सुधारतेय ‘क्वालिटी ऑफ लाइफ’
फुफ्फुस पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय चाचणीनंतर रुग्णांचा ‘क्वालिटी ऑफ लाइफ’ हा स्कोअर नोंदविला जातो. बहुतांशी रुग्णांमध्ये या उपचारानंतर हा स्कोअर सुधारल्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.