मानसिक आरोग्य जपण्यासाठी 'ही' गोष्ट ठरते महत्त्वाची!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 03:42 PM2019-06-20T15:42:05+5:302019-06-20T15:43:58+5:30
एका संशोधनामध्ये, नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या लोकांमध्ये झोपेच्या समस्या या मानसिक कारणांशी निगडीत असल्याचे दिसून आले आहे.
एका संशोधनामध्ये, नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या लोकांमध्ये झोपेच्या समस्या या मानसिक कारणांशी निगडीत असल्याचे दिसून आले आहे. स्लीप पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनामध्ये, जवळपास सरासरी 31 वर्षांचे 165 (52 टक्के पुरूष) लोक सहभागी झाले होते.
संशोधनामध्ये सहभागी करण्यात आलेल्या सर्व व्यक्ती, 2010मधील भूकंपाने प्रभावित असणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असलेल्या पोर्ट-ए-प्रिंस-हॅतीमधील होत्या. सर्वेक्षणानुसार, हा देशाच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप होता. यामध्ये जवळपास 2 लाख लोकांचा मृत्यू झाला होता आणि 10 लाखांपेक्षा जास्त निवासी लोकांचे विस्थापन करावे लागले.
न्यूयॉर्क यूनिवर्सिटीतील संशोधनाचे प्रमुख लेखक जूडिट ब्लँकने सांगितले की, 2010मध्ये झालेल्या हैती भूकंपातून बचावलेले लोकांमध्ये असलेल्या झोपेच्या समस्यांबाबत जाणून घेण्यासाठी करण्यात आलेलं हे पहिलं संशोधन आहे.' पुढे बोलताना ब्लँक यांनी सांगितले की, 'या संशोधनातून या आपत्तीमधून बचावलेल्या लोकांचा समूह आणि मध्ये कोमोरिड झोपचे स्थिती यांमध्ये असलेला संबंध रेखांकित करण्यात आला आहे.'
संशोधकांनी भूकंपानंतर दोन वर्षांपर्यंत या नैसर्गिक आपत्तीमधून बचावलेल्या लोकांचे सर्वेक्षण केलं. त्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की, 94 टक्के सहभागी लोकांमध्ये झोपेच्या समस्या आढळून आल्या. दोन वर्षांनंतर 42 टक्के लोकांमध्ये पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) चा महत्त्वपूर्ण स्तर दिसून आला. जवळपास 22 टक्के लोकांमध्ये डिप्रेशनची समस्याही दिसून आली.
वरील संशोधनातून असं सिद्ध झालं की, नैसर्गिक आपत्तीमधून बचावलेले लोक, ज्यांनी आपल्या जवळची माणसं, संपत्ती, घर-दार सगळचं गमावलं ते घटनेच्या दोन वर्षांनंतरही मानसिक तणावाखाली होती. त्यामुळे त्यांना झोपेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. परिणामी, कोणत्याही कारणामुळे आलेला मानसिक तणाव आणि झोप यांचा संबंध असतो, हे यातून सिद्ध झालं.
टिप : वरील सर्व गोष्टी या संशोधनातून सिद्ध झाल्या असून त्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.