हाताला गाठ लागली, काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 09:49 AM2018-04-10T09:49:18+5:302018-04-10T09:49:18+5:30

स्वत:कडे दुर्लक्ष, संकोच, आर्थिक चिंता या चक्रात कॅन्सर गाठतो तेव्हा..

Got it, what will you do? | हाताला गाठ लागली, काय कराल?

हाताला गाठ लागली, काय कराल?

googlenewsNext

- डॉ. निष्ठा पालेजा
आमच्याकडेही ग्रामीण भागातून स्तनांचा कर्करोग झालेल्या महिला रुग्ण येतात त्या आजार तिसऱ्या टप्प्यात गेल्यानंतरच. स्तनाची गाठ मानेपर्यंत पसरलेली असते. स्तनाच्या त्वचेला जखमा झालेल्या असतात. अशा टप्प्यात केवळ उपचाराचा कालावधी आणि खर्चच वाढतो असं नाही तर उपचाराची तीव्रताही वाढते. त्याउलट लवकर निदान झालं तर एका छोट्या आॅपरेशननंही महत्त्वाचं काम होऊ शकतं. मात्र आजार तिसºया टप्प्यात पोहचतो तेव्हा रेडिएशन, ते नको असेल तर स्तन काढून टाकणं यासह बरीच मोठी उपचार प्रक्रिया करावी लागते.
आजार एवढा वाढल्यावर का आल्या असं या ग्रामीण भागातील महिलांना विचारतो. मात्र त्या जे सांगतात त्यातून आजाराविषयी माहितीचा अभाव आणि स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकताच समोर येते.

स्वत:च्या स्तनांची तपासणी स्वत: करणं हे ग्रामीण भागातल्या महिलांना माहिती नसतं त्यामुळे आपल्या लेकीबाळींना यासंदर्भात चार शहाणपणाच्या गोष्टीही त्या सांगू शकत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे बायकांचा स्वत:च्या आरोग्याकडे बघण्याचा दुय्यम दृष्टिकोन. आधी घरातल्यांचं, मुलाबाळांचं, नव-याचं, सासूसासºयांचं करून मग वेळ उरला तर बाई स्वत:कडे पाहते. स्वत:च्या दुखण्या-खुपण्याकडे बारकाईनं बघण्याची मानसिकताच नाही. त्यातून स्तनात न दुखणारी गाठ लागली तर तिचा काही त्रास नाही म्हणून सर्रास दुर्लक्ष होतं. आणि गाठ हाताला लागली तर ती कॅन्सरची असेल या भीतीनंही डॉक्टरकडे जाण्याचा संकोच. स्तनासारखी अवघड जागा डॉक्टरांना कशी दाखवावी (महिला डॉक्टरलाही) अशी लाजही वाटते. पैशांची चणचण, मुलांचं शिक्षण यांसारख्या आर्थिक अडचणीही असतातच.

यासर्व कारणांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आपला आजार घेऊन डॉक्टरांपर्यंत पोहचायला बराच उशीर झालेला असतो. आधीच स्वत:च्या खाण्यापिण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये पोषक मूल्यांची मोठी कमतरता असते. त्यात किमोथेरेपी सुरू केल्यानंतर विशिष्ट आहार घेण्याकडेही त्यांचा कल नसतो. एकतर त्रास होतो म्हणून खाणार नाही नाहीतर मिळेल ते खाणार यामुळे अजूनच शरीरात कमतरता निर्माण होतात. याच कारणामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोग रिकरन्सची शक्यता खूप दाट असते.

थोडी जागरूकता ठेवली, स्तनांचं स्वपरीक्षण शिकून घेतलं, त्यातलं गांभीर्य ओळखलं तर खूप उशिराच्या टप्प्यावर जाऊन आजाराशी लढाई लढावी लागणार नाही. वैद्यकीय यंत्रणेनं ग्रामीण भागातील, वाड्यापाड्यातील महिलांपर्यंत पोहचणं जितकं गरजेचं आहे तितकंच या महिलांनीही आपल्या मनातला संकोच बाजूला सारून स्वत:साठी म्हणून डॉक्टरांकडे येणंही गरजेचं आहे.

(संचालक, क्लिनिकल रिसर्च एचएससी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक)



 

Web Title: Got it, what will you do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.