सरकारचा मोठा निर्णय, कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी 3 महत्वाची औषधं स्वस्त! अशी आहेत नावं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 05:26 PM2024-10-29T17:26:16+5:302024-10-29T17:29:48+5:30
करकपातीचा परिणाम औषधांच्या किमतीवरही दिसायला हवा, असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळेच आता सरकारने या औषधांचे एमआरपी कमी करण्याचा आदेश दिला आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने या औषधांवरील कस्टम ड्युटी आधीच रद्द केली आहे.
देशातील नागरिकांना जीवनावश्यक औषधी स्वस्त दरात मिळावी, यासाठी त्यांच्या किमतींवर सरकारचे नियंत्रण असते. आता सरकारने कर्करोगग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे आता कर्करोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रमुख औषधींच्या किंमत कमी होणार आहेत. शासनाने यासंदर्भात आदेशही दिले आहेत.
देशातील आवश्यक औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्याचे काम नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) करते. आता NPPA ने कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या Trastuzumab, Osimertinib आणि Durvalumab या तीन औषधांची MRP (maximum retail price) अथवा कमाल किरकोळ किंमत कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.
किफायतशीर दरात औषधी उपलब्ध करून देण्यास वचनबद्ध -
कॅन्सरवरील या औषधांची किंमत कमी करताना सरकारने म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक औषधी किफायतशीर किमतीत मिळत रहावेत, यासाठी आपण वचनबद्ध आहोत. त्यामुळेच औषधांच्या कमाल किमती कमी करण्याचे निर्देश एनपीपीएने दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, नुकतेच या औषधांवरील जीएसटी दर कमी करण्यात आला आहे. तसेच, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये या औषधांवरील कस्टम ड्युटीही रद्द करण्यात आली आहे.
त्यामुळे करकपातीचा परिणाम औषधांच्या किमतीवरही दिसायला हवा, असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळेच आता सरकारने या औषधांचे एमआरपी कमी करण्याचा आदेश दिला आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने या औषधांवरील कस्टम ड्युटी आधीच रद्द केली आहे.
10 ऑक्टोबरपासूनच नवे दर लागू -
सरकारने या औषधांवरील जीएसटी दर नुकताच 12 टक्क्यांवरून 5 टक्के केला आहे. यामुळे कंपन्यांना 10 ऑक्टोबर 2024 पासूनच एमआरपी कमी करायची होती. कारण या औषधांची नवी एमआरपी त्याच दिवसापासून प्रभावी मानली जाईल. उत्पादकांना एमआरपी कमी करून किंमतीतील बदलासंदर्भात डीलर्स, राज्य औषध नियंत्रक आणि सरकारला माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.