केस गळताहेत? टक्कल पडतंय? जा डेंटिस्टकडे... ‘हेअर ट्रान्सप्लांट’ची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 07:32 AM2023-02-28T07:32:25+5:302023-02-28T07:32:35+5:30
नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये नवा ‘केस’ पेपरच दंतवैद्यक करू शकणार ‘हेअर ट्रान्सप्लांट’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केस गळताहेत? टक्कल पडतंय? जा डेंटिस्टकडे... असे कोणी सांगितले तर समोरच्याला तुम्ही नक्कीच वेड्यात काढाल. परंतु आता चक्क दंतवैद्यकही (डेंटिस्ट) केशरोपण (हेअर ट्रान्सप्लांट) करू शकणार आहेत. भारतीय दंत परिषदेने आता जबडा तसेच संपूर्ण चेहऱ्याशी संबंधित शस्त्रक्रिया करणाऱ्या मुखदंत शल्यचिकित्सा व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया तज्ज्ञांना (ओरल मॅक्सोफेशियल सर्जन) केशारोपण करण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नायर दंत रुग्णालयात ‘हेअर ट्रान्सप्लांट’ची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
अकाली केस गळणे, टक्कल पडणे अशा समस्या वाढीस लागल्या आहेत. विशेषत: तरुणांमध्ये या समस्या लक्षणीय प्रमाणात आहेत. या पार्श्वभूमीवर शहरी भागांत केशरोपण प्रक्रियेचे क्लिनिक्स सुरू झाले. तेथे उपचारासाठी हजारो रूपये शुल्क आकारले जाते. दंत वैद्यकशास्त्रात पदव्युत्तर शाखेचे ९ विषय आहेत. त्यातील फक्त ओरल मॅक्सोफेशियल सर्जन्सना केशरोपणाची परवानगी देण्यात आली आहे. सरसकट सर्व दंत वैद्यकांना परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच त्यासाठी काही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचे पालन करणे बंधनकारक असल्याचे भारतीय दंत परिषदेने परवानगी देताना स्पष्ट केले आहे.
नियम कोणते?
प्रशिक्षित सर्जन्स ज्या रुग्णालयात केशरोपणाचे उपचार देणार आहेत त्या ठिकाणी प्रशिक्षित ऑपरेशन थिएटर सहायक, अर्हताधारक परिचारिका असणे अपेक्षित आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णावर उपचार करण्यात येणार आहे, तेथे रुग्णभरती करून उपचार करता येतील अशी व्यवस्था हवी. बधिरीकरणतज्ज्ञ असावा. या सर्व रुग्णांच्या नोंदी ठेवाव्यात. हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी आणि केल्यानंतर रुग्णाचे छायाचित्र काढावे लागणार आहे.
भारतीय दंत परिषदेने परवानगी दिल्याने आता संबंधित सर्जन्सना हेअर ट्रान्सप्लांट करण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी त्यांनी आधी या विषयाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, तशी अटच घालण्यात आली आहे. या विषयातील दरवर्षी तीन विद्यार्थी आमच्याकडे येतात. ही सुविधा रुग्णालयात सुरू करण्यापूर्वी आम्ही आमच्या या विषयातील विद्यार्थ्यांना नायर रुग्णालय आणि केईएम रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन आणि त्वचारोगतज्ज्ञांकडून, जे केशारोपण करतात, प्रशिक्षण घेणार आहेत. त्यानंतरच ही सुविधा येथे सुरू करणार आहोत.
- डॉ. नीलम अंड्राडे, संचालक-मुंबई महापालिका वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये