अर्धी लोकसंख्या अनफिट, व्यायाम वाटतोय नकोसा; पुरुषांच्या तुलनेत महिला कमी फिट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 07:56 AM2024-06-28T07:56:44+5:302024-06-28T07:57:02+5:30
पुरुषांच्या तुलनेत महिला कमी फिट; आजार वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतातील नागरिकांना व्यायामचे वावडे असल्याचे समोर आले असून यामुळे देशातील निम्मी तरुण लोकसंख्या शारीरिकदृष्ट्या फिट नसल्याचे समोर आले आहे. देशातील निम्मी प्रौढ लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पूर्णपणे तंदुरुस्तीचे निकष पूर्ण करत नाही. पुरुषाच्या (५७%) तुलनेत महिला (४२%) कमी फीट आहेत. लॅन्सेट हेल्थच्या अहवालानुसार, भारतीय प्रौढांमधील शारीरिक हालचाल मंदावली आहे. २००० मध्ये शारीरिक हालचाल कमी करण्याचे प्रमाण २२.३ टक्के होते ते २०२२ मध्ये ४९.४ टक्के झाले आहे.
आजार वाढले
अहवालानुसार, शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे प्रौढांमध्ये हृदयविकार, टाइप २ मधुमेह, स्मृतिभ्रंश आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
जगभरातील जवळपास एक तृतीयांश (३१ टक्के) प्रौढांनी २०२२ मध्ये व्यायाम केला नाही.
कमी शारीरिक हालचालींच्या बाबतीत भारत १९५ देशांमध्ये १२व्या क्रमांकावर आहे.
महिलांचे स्वत:वर लक्ष नाही
- अहवालानुसार, भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये महिलांमध्ये कमी शारीरिक हालचाल हा चिंतेचा विषय आहे.
- घरातील कामात त्यांचा जास्त सहभाग असल्याने त्यांना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
किमान १५० ते ३०० मिनिटे व्यायाम करा
जर शारीरिक हालचाल वाढविली नाही तर २०३० पर्यंत देशातील ६० टक्के जनता तंदुरुस्त अनफिट असेल. फिट नसल्याने आजारांची भीती वाढेल, असे अहवालात म्हटले आहे. डब्ल्यूएचओ प्रौढांसाठी दर आठवड्याला किमान १५० ते ३०० मिनिटे मध्यम एरोबिक व्यायाम करण्याची शिफारस करते.
तरुणांमधील व्यायाम करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बैठे काम वाढले आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. पर्यावरणातील बदल, वाहनांवरील वाढते अवलंबित्व आणि सतत मोबाइलला चिटकून राहिल्याने पुरेशी झोप मिळत नसल्यानेही व्यायाम करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. - डॉ. रुडिगर क्रेच, आरोग्य प्रचार संचालक, डब्ल्यूएचओ