सुखनिद्रा : स्मरणशक्तीचा संबंध झोपेशी असतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 09:56 AM2021-06-11T09:56:56+5:302021-06-11T09:57:17+5:30
Happiness: खरे म्हणजे झोपेमुळे आकलन शक्ती वाढते, स्मृती बळकट होते आणि मोक्याच्या वेळेला म्हणजे उत्तरपत्रिका लिहिताना स्मरणशक्ती दगा देत नाही.
- डॉ. अभिजित देशपांडे,
(इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस)
रात्री जागून अभ्यास करायची सवय अनेकांना असते. परीक्षा जवळ आली की, अजिबात झोप न घेता, पूर्ण रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण किती मेहनत करतो असेच वाटते! परंतु, ऐन परीक्षेमध्ये या सवयींचा फायदा न होता उलट तोटाच होतो. २०१९ साली अमेरिकेतील जगप्रसिद्ध MIT विद्यापीठातील हुशार विद्यार्थ्यांची झोप आणि परीक्षेतील यश यांचा अभ्यास केला गेला. जरुरीपेक्षा कमी झोप घेणाऱ्या मुलांना कमी मार्क पडल्याचे आढळले. अनेकांना असे वाटले की, यात काय नवल? कमी झोपल्याने शारीरिक अथवा मानसिक थकवा येतो आणि त्यामुळे परीक्षेतील कामगिरीवर परिणाम होत असेल. हे उत्तर अंशतः बरोबर आहे.
खरे म्हणजे झोपेमुळे आकलन शक्ती वाढते, स्मृती बळकट होते आणि मोक्याच्या वेळेला म्हणजे उत्तरपत्रिका लिहिताना स्मरणशक्ती दगा देत नाही. झोपेचा आणि स्मरणशक्तीचा एकमेकांशी काय संबंध आहे? - हे जाणून घेण्याअगोदर आपण स्मरणशक्तीबद्दल जुजबी माहिती घेऊ या. ढोबळ मानाने आपली स्मृती अल्पकालीन (Short Term ) तसेच दीर्घ मुदतीची (Long Term) असते. अल्प मुदतीच्या स्मृतीचा उपयोग तात्पुरता असतो. उदाहरणार्थ एखाद्याने फोन नंबर सांगितल्यानंतर लगेच तो नंबर लक्षात ठेवून लावणे! याउलट तोच नंबर दुसऱ्या दिवशी लक्षात राहण्याकरिता दीर्घकालीन स्मृतीची गरज असते. दीर्घकालीन स्मृती दोन प्रकारची असते. स्पष्ट स्मृती (Explicit) आणि विहीत किंवा अंतर्भूत (Implicit ) स्मृती. ‘‘स्पष्ट’’ स्मृती ही शब्दांमध्ये व्यक्त करता येते तर विहित स्मृती ही शब्दाने व्यक्त करणे कठीण असते.
माझा एक वर्गमित्र जीतू. त्याला गाण्याची चाल व्यवस्थित आठवायची; पण गाण्याचे शब्द भलतेच वापरायचा. याचा अर्थ जीतूची विहित (Implicit) स्मृती म्हणजे ‘‘चाल’’ आणि ‘‘लय’’ बरोबर असली तरी स्पष्ट (Explicit) स्मृती म्हणजे ‘‘शब्द’’ योग्य नव्हती. या उलट हरीश पाठारे नामक मित्राला शब्द अचूक आठवायचे; पण चाल व्यवस्थित आठवायची नाही. एखादा प्रसंग आठवणे हे ‘‘स्पष्ट’’ स्मृतीचे उदाहरण आहे; अंतर्भूत अथवा विहित स्मरणशक्ती याचा झोपेशी काय संबंध असतो, याबाबत अधिक पुढच्या शुक्रवारी!