इतरांचा द्वेष करता? होऊ शकतो हा त्रास; निरोगी हृदयासाठी सकारात्मक विचार करण्याचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 08:46 AM2023-10-02T08:46:44+5:302023-10-02T08:47:21+5:30
तुम्ही दैनंदिन आयुष्यात इतरांबाबत द्वेषभावना, मत्सर बाळगत असाल, तर ही बाब तुमच्या हृदयासाठी धोकादायक आहे.
जयपूर : तुम्ही दैनंदिन आयुष्यात इतरांबाबत द्वेषभावना, मत्सर बाळगत असाल, तर ही बाब तुमच्या हृदयासाठी धोकादायक आहे. इतरांबद्दलच्या वाईट विचारामुळे शरीरात स्रवणाऱ्या हार्मोन्समुळे हृदयावर परिणाम होत असल्याचे निरीक्षण हृदयरोगतज्ज्ञांनी मांडले. जयपूर येथे पार पडलेल्या परिषदेत तज्ज्ञांनी हृदयरोगाविषयी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
एखादा व्यक्ती सातत्याने तणावात राहत असेल, इतरांशी द्वेषभावना बाळगत असेल, त्यांना कमी लेखत असल्यास किंवा एखाद्याला कमी लेखून पुढे जाण्याचाच सातत्याने विचार करत असल्यास संबंधित व्यक्तीच्या शरीरात एपिनेफ्रिन, नॉरपेनेफ्रिन आणि कोर्टिसोलसारखे नकारात्मक हार्मोन्स स्रवले जातात. त्याचा परिणाम थेट हृदयावर होतो.
नोकरदार महिलांना अधिक धोका
मागील दहा वर्षांमध्ये नोकरदार महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. नोकरीतील तणाव, कामाचा दबाव आदींमुळे महिलांमध्ये कमी वयातच म्हणजेच रजोनिवृत्तीपूर्वी हृदयरोगाचा धोका २१% वाढण्याचा धोका असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी मांडले.
एनर्जी ड्रिंक्सही ठरू शकते धोकादायक
अनेकजण उत्साही, फ्रेश राहण्यासाठी एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतात. मात्र, यामुळे हृदयरोगाचा धोका १०% वाढण्याची शक्यता असते. अशाप्रकारच्या पेयांमध्ये असलेले रासायनिक प्रिझर्वेटिव्ह आरोग्यावर विपरीत परिणाम करत असल्याचे मत डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केले.
कसे ठेवाल हृदयाला निरोगी?
नियमित व्यायाम आरोग्य तपासणी
छातीत जळजळीकडे दुर्लक्ष नको
फास्टफूड वा जंकफूड खाणे टाळावे
निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे
धूम्रपान, मद्यपान वर्ज्य करणे