सतत डोकं दुखत राहणं नाही सामान्य! असू शकतो 'हा' गंभीर आजार वेळीच दक्षता घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 05:02 PM2022-05-15T17:02:34+5:302022-05-15T17:04:45+5:30
डोकं दुखू लागल्यास आपण प्रामुख्यानं घरगुती उपाय (Home Remedies) करतो. दुखणं अधिक असेल तर औषध घेतो. दुखणं थांबलं, की आपण या समस्येकडे दुर्लक्ष करतो; पण वारंवार ही समस्या उद्भवणं हे एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं.
अलीकडच्या काळात बदलती जीवनशैली, ताण-तणाव आणि धावपळीमुळे शारीरिक समस्या निर्माण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही समस्या किरकोळ स्वरूपाच्या असतात; पण त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिलं गेलं नाही, तर भविष्यात गंभीर आजार होण्याचा धोका असतो. डोकेदुखी (Headache) ही समस्या यापैकीच एक म्हणता येईल. डोकं दुखू लागल्यास आपण प्रामुख्यानं घरगुती उपाय (Home Remedies) करतो. दुखणं अधिक असेल तर औषध घेतो. दुखणं थांबलं, की आपण या समस्येकडे दुर्लक्ष करतो; पण वारंवार ही समस्या उद्भवणं हे एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे डोकेदुखीची नेमकी कारणं (Causes) काय आहेत, हे माहिती असणं आवश्यक आहे. याविषयीची माहिती देणारं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे.
`वेबएमडी` (WebMD) या मेडिकल वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, डोकेदुखीमागे सुमारे 150 प्रकारची कारणं असू शकतात; मात्र त्यातली प्रमुख कारणं कोणती आहेत हे पाहणंदेखील महत्त्वाचं आहे. पोस्ट ट्रॉमॅटिक डोकेदुखी (Post Traumatic Headache) सामान्य नसते. या वेदना कोणत्याही प्रकारच्या दुखापतीनंतर जाणवतात. दुखापतीनंतर दोन ते तीन दिवसांनी ही डोकेदुखी जाणवू लागते. तेव्हा संबंधित व्यक्तीला स्मृतीशी (Memory) संबंधित समस्या जाणवू शकते. तसंच, थकवा, चिडचिडेपणा, एकाग्रतेत अडचणी यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. ही डोकेदुखी काही आठवड्यांपर्यंत जाणवत राहते.
मायग्रेन (Migraine) अर्थात अर्धशिशीमुळे डोक्यात असह्य वेदना जाणवतात. अशा प्रकारची डोकेदुखी काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंत राहते. `वेबएमडी` या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ही डोकेदुखीची समस्या महिन्याभरात अनेक वेळा जाणवू शकते. साध्या शब्दांत सांगायचं झालं, तर संबंधित व्यक्तीला तीन ते चार वेळा या समस्येचा सामना करावा लागतो. याशिवाय मायग्रेनचा त्रास होताना रुग्णात अजूनही काही लक्षणं दिसून येतात. तीव्र प्रकाश नकोसा वाटणं, मोठा आवाज सहन न होणं, उलट्या होणं आणि भीती वाटणं या लक्षणांचा यात समावेश असतो. मायग्रेनच्या त्रासात भूक लागत नाही आणि त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात.
अनेकदा ताणामुळेही (Stress) डोकेदुखीचा त्रास होतो. अशा प्रकारची डोकेदुखी सर्वसामान्यपणे बहुतांश जणांना जाणवते. वृद्ध किंवा तरुणांमध्ये ही समस्या दिसून येते. ताण-तणाव हे या डोकेदुखीचं प्रमुख कारण असून, यात अन्य कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत.
सायनसमुळे (Sinus) डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. यात व्यक्तीच्या गालाची हाडं, कपाळावर किंवा नाकाच्या वरच्या पृष्ठभागावर वेदना होतात. कपाळामध्ये आढळणाऱ्या पोकळीला सायनस असं म्हणतात. त्या ठिकाणी सूज आल्यास डोकेदुखीचा त्रास होतो. तेव्हा डोकेदुखीसह नाक वाहणं, कानात सर्दी साठणं, ताप, चेहऱ्यावर सूज अशी लक्षणं दिसतात. सायनसमध्ये नाकातून कफासारखा चिकट पदार्थ वाहू लागतो. याचा रंग पिवळा किंवा फिकट हिरवा असतो.
काही वेळा डोकेदुखी विशिष्ट भागांमध्ये जाणवते. त्यामुळे तिला क्लस्टर डोकेदुखी (Cluster Headache) असं म्हणतात. या वेदना एका दिवसात अनेक वेळा जाणवू शकतात. या वेदना असह्य आणि गंभीर स्वरूपाच्या असतात. या दुखण्यावेळी संबंधित व्यक्तीला डोळ्यांभोवती तीव्र टोचल्यासारखं आणि आग झाल्यासारखं जाणवतं. डोळे कोरडे पडणं, लाल होणं, डोळ्यांतल्या बाहुल्यांचा आकार लहान होणं, डोळ्यांमधून सतत पाणी येणं ही लक्षणंही दिसून येतात. तसंच, डोक्याच्या भागात वेदना होतात, त्या बाजूची नाकपुडी कोरडी पडते. ही डोकेदुखी दोन आठवड्यांपासून ते तीन महिन्यांपर्यंत राहू शकते.