डोकं शांत ठेवण्यासोबतच केस वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरतो कापूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 02:40 PM2018-10-17T14:40:37+5:302018-10-17T14:41:31+5:30
फार पूर्वीपासूनच कापराला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. परंतु कापराचा उपयोग फक्त धार्मिक विधींसाठी न करता, इतरही अनेक गोष्टींसाठी करता येतो.
फार पूर्वीपासूनच कापराला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. परंतु कापराचा उपयोग फक्त धार्मिक विधींसाठी न करता, इतरही अनेक गोष्टींसाठी करता येतो. त्याचप्रमाणे कापराचे अनेक औषधी गुणधर्म देखील असतात. कापूर शरीर आणि डोकं दोन्ही शांत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे सांधेदुखी, भाजणं किंवा कापणं यांसारख्या अनेक समस्यांसाठी कापूर फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया कापराच्या विविध फायद्यांबाबत...
केस वाढविण्यासाठी फायदेशीर
केसांची वाढ खुंटण्याची अनेक कारणं असतात. परंतु, कापराच्या तेलाचा वापर केल्याने या समस्येपासून सहज सुटका करणं शक्य होतं. यासाठी केसांना लावण्यासाठी जे तेल वापरणार आहात त्या तेलामध्ये कापराचे तेल मिक्स करून लावा. यामुळे डोक्याच्या त्वचेचा रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे केस वाढण्यास मदत होते.
डासांपासून सुटका
डेंग्यू हा डास चावल्यामुळे होणारा एक गंभीर आजार आहे. यापासून बचाव करण्यासाठी डासांचा बंदोबस्त करणं गरजेचं असतं. कापूर डासांना पळवून लावण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरतो. यासाठी खोलीमध्ये कापूर जाळून खिडक्या आणि दरवाजे बंद करून घ्या. यामुळे खोलीतील सर्व डास पळवून लावण्यास मदत होईल.
डोकं शांत ठेवण्यासाठी
अनेकजणांना झोपेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कापराच्या तेलाचा गंध डोकं शांत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे शांत झोप लागण्यासही मदत होते. यासाठी कापराच्या तेलाचे काही थेंब तुमच्या उशीला लावून झोपा. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होईल.
सर्दीमुळे बंद झालेलं नाक मोकळं करण्यासाठी
अनेकदा सर्दी झाल्यामुळे नाक बंद होण्याचा त्रास सर्वांनाच होतो. यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो आणि सतत येणाऱ्या शिंकांचा सामना करावा लागतो. कापूर या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे. यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये कापराचे काही तुकडे टाकून वाफ घ्या.
खाजेपासून सुटका
त्वचेला झालेल्या अॅलर्जीमुळे त्वचा लाल होणं, त्वचेवर डाग येणं यांसारख्या समस्या होतात. यासाठी कापराचे तेल अॅलर्जी झालेल्या त्वचेवर लावा.
टिप : जर तुम्हाला एखाद्या गोष्टी अथवा पदार्थाची अॅलर्जी असेल तर तज्ज्ञांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्यानेच वरील उपायांचा वापर करा.