उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल तर 'या' आजारांपासून चार हात लांब राहाल; वाचा फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 08:12 PM2021-03-19T20:12:13+5:302021-03-19T20:15:05+5:30
Health Tips in Marathi : तांब्याच्या भांड्यात नियमित पाणी पिल्याने शरीराला उपयुक्त तत्त्व मिळत असतात, ज्याने आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त अजून काय फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.
तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील. जास्तीत जास्त लोक पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर करतात. उन्हाळ्यात वातावरणातील गरमी वाढते. अशा शरीराला थंडावा मिळण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर फायदेशीर ठरतो. प्राचीन काळापासून धातूच्या भांड्यात जेवण करणे किंवा पाणी पिणे आरोग्यदायी मानण्यात आले आहे. त्यात इतर धातूंपेक्षा तांब्याचं भांडं अतिशय शुद्ध समजले जाते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात नियमित पाणी पिल्याने शरीराला उपयुक्त तत्त्व मिळत असतात, ज्याने आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त अजून काय फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.
फायदे
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. याने शरीरातील तांब्याची कमतरता पूर्ण होते. याने रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित राहतं. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी अधिक शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात. तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी(विषाणूंशी लढण्याचे) गुण असतात. ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने फायदा होतो.
पोटाच्या वेगवेगळे आजार पळवून लावण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे केल्यास तुमचा डॉक्टरकडे होणारा खर्च नक्कीच कमी होऊ शकतो. दररोज हे पाणी प्यायल्यास पोटदुखी, गॅस,अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर आराम मिळतो.
तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही. या पाण्यामुळे पिंपल्स तसेच त्वचेसंदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि अधिक चमकदार होते. शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं लाभदायक असतं.
तांब्याची भांडी वापरल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी हे करा
तांब्याच्या भांड्यांचा वापर करताना काही गोष्टींचा काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक लोकांच्या घरात तांब्याच्या भांड्याचा वापर करताना ग्लास किंवा जग वापरला जातो जर तुम्ही पाणी पिण्याआधी तांब्याची भांडी जमीनीवर ठेवायची चूक करत असाल तर त्या पाण्यातील पोषक तत्व तुम्हाला मिळणार नाहीत.
तांब्याच्या भांड्यांचा काही काळ वापर केल्यानंतर त्याला काळपटपणा येतो. भांड्यांवर थर जमा झाल्यास त्याचा पाण्याशी थेट संपर्क येत नाही. त्यामुळे वापर करण्याआधी तांब्याचं भांड स्वच्छ धुतलेलं असणं गरजेचं आहे. हिवाळ्यात जर तांब्याची भांडी व्यवस्थित न धुता त्याचा वापर कराल तर महागात पडू शकतं. कारण त्यावर वेगळ्या प्रकारचा थर जमण्यास सुरूवात होते. हे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे तर तुम्ही तांब्याची भांडी वापरत असाल तर त्यांची स्वच्छता ठेवणं सुध्दा तितकचं महत्वाचं आहे.