प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्सचा खजिना आहेत शेवग्याच्या शेंगा, कधी औषध घेण्याची पडणार नाही गरज!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 10:32 AM2020-02-03T10:32:59+5:302020-02-03T10:33:04+5:30
तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याचे फायदे सांगितले तर तुम्ही अधून मधून नाही तर नियमितपणे शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल.
अनेकजण आवडीने शेवग्याच्या शेंगा खातात. पण या शेंगाचे फायदे फारच कमी लोकांना माहीत असतात. जर तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याचे फायदे सांगितले तर तुम्ही अधून मधून नाही तर नियमितपणे शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल. या शेंगांची केवळ खासियत नसून आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या याने दूर केल्या जाऊ शकतात. इतकेच काय तर मांस, अंडी आणि दुधापेक्षाही जास्त प्रोटीन तुम्हाला या भाजीतून मिळू शकतं.
शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे. कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे फीनॉलिक असतात. शेवग्याच्या केवळ शेंगाच नाही तर याच्या पानांचा देखील भाजीसाठी वापर केला जातो.
हाय ब्लड प्रेशर
ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल अशा लोकांनी शेवग्याच्या शेंगाची भाजी खाणं फायदेशीर ठरतं. तसेच याने अस्वस्थता, चक्कर येणे आणि उलटी होणे अशाही समस्या दूर होतात.
वाढतं वय कंट्रोल करा
(Image Credit : reportshealthcare.com)
शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं. ज्याचा वापर पूर्वीपासून सौदर्यासाठी केला जातो. जर तुम्ही या शेवग्याच्या शेंगाचा आहारात नियमित समावेश कराल तर तुमच्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसणार नाही. तसेच याने डोळ्यांची दृष्टीही चांगली राहते.
कॅल्शिअमचा स्त्रोत
शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. ज्याने तुम्हाला हाडे मजबूत करण्याला मदत मिळते. तसेच दातही मजबूत होतात. म्हणूनच लहान मुलांना या शेंगांची भाजी देणं फायदेशीर मानलं जातं.
लठ्ठपणा कमी करा
लठ्ठपणा आणि शरीराची वाढलेली चरबी दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा एक फायदेशीर उपाय मानला जातो. यात फॉस्फोरस भरपूर प्रमाणात आढळतं जे शरीरातील अतिरिक्त कॅलर कमी करतं आणि सोबतच चरबी कमी करून तुमचा लठ्ठपणाही दूर करतं.
रक्त शुद्ध होतं
शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्येदेखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरात अॅन्टीबायोटीक एजंट म्हणून काम करते. त्यामुळे रक्तातील दुषित घटक वाढल्याने होणारा अॅक्नेचा त्रास, त्वचाविकार कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.
रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवतात
शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी मधूमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पित्ताशयाचे कार्य सुधारण्यासही शेंग़ा फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीराचे कार्य आणि स्वास्थ्यही सुधारतं.
श्वसनविकारांना कमी करते
(Image Credit : pennmedicine.org)
घशातील खवखव, कफ, श्वास घेताना त्रास होणे असा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगांचे कपभर सूप प्यावे. यामधील दाहशामक घटक श्वसनमार्गातील टॉक्सिक घटक कमी करण्यास मदत करतात. क्षयरोग, ब्रोन्कायटीस, अस्थमा यासारख्या फुफ्फुसांच्या आजारांमध्येही शेवग्याच्या शेंगा उत्तम नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात.
संसर्गापासून संरक्षण होतं
शेवग्याच्या पानांमध्ये, फूलांमध्ये अॅन्टीबॅक्टेरियल घटक असतात. यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतं. तसेच शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी करण्यासही शेवग्याच्या शेंग़ा फायदेशीर ठरतात.