'हे' फायदे वाचून गवारीची नावडती भाजी आवडती कराल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 12:03 PM2019-06-23T12:03:59+5:302019-06-23T12:04:52+5:30
भाज्या आणि लहान मुलांचा छत्तीसचा आकडा असतो. तुम्हीही लहानपणी अनेकदा ही भाजी नको, मी नाही खाणार, मला नाहीच आवडत... असे हट्ट भाज्या खाताना आईकडे केलेच असतील.
भाज्या आणि लहान मुलांचा छत्तीसचा आकडा असतो. तुम्हीही लहानपणी अनेकदा ही भाजी नको, मी नाही खाणार, मला नाहीच आवडत... असे हट्ट भाज्या खाताना आईकडे केलेच असतील. पण आईसोबतच घरातील सर्व मोठी माणसं आपल्याला समजावण्याता अतोनात प्रयत्न करत असतं. भाज्या का खाव्यात, त्यांचे फायदे यांसारख्या अनेक गोष्टी ते समजावून सांगत. पण आपण मात्र आपल्या निर्णयावर ठाम... नाहीतर नाहीच खाणार... अशाच नावडत्या भाज्यांमध्ये प्रामुख्याने समावेश होणारी भाजी म्हणजे, गवार. खरं तर या भाजीचा अनेकांच्या आवडत्या भाज्यांच्या यादीमध्ये प्रामुख्याने समावेश होतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या या नावडत्या भाजीमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक पौष्टिक तत्वांचा समावेश होतो. आज आम्ही तुम्हाला गवारीच्या भाजीचे फायदे सांगणार आहोत. हे फायदे माहिती झाल्यावर नक्कीच तुम्ही गवारीच्या भाजीचा आवडत्या भाज्यांमध्ये समावेश कराल.
गवारीची भाजी म्हणजेच क्लस्टर बीन भाजीपेक्षा जास्त एक औषधी वनस्पती आहे, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. या भाजीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स व्हिटॅमिन K, C, A भरपूर प्रमाणात आढळून येतात. या व्यतिरिक्त यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम आढळून येते. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा फॅट आढळून येत नाही. त्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. जाणून घेऊया गवारीच्या भाजीचे आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांबाबत...
डायबीटीज
गवारीच्या भाजीमध्ये आढळून येणारं ग्लायको न्युट्रिएन्ट्स डायबिटीज रुग्णांसाठी एखाद्या वरदानाप्रमाणे आहेत. हे न्युट्रिएन्ट्स रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच याचे डाएट फायबर्स अन्न पचवण्यास मदत करतात. डायबिटीज रुग्णांनी कच्ची गवार खाल्ल्यास त्यांना आणखी फायदा होतो.
हाडांच्या मजबुतीसाठी
या भाजीमध्ये आढळून येणारे कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम हाडांच्या मजबुतीसाठी सहायक ठरतात. जर तुम्ही अशक्त असाल किंवा हाडांशी निगडीत समस्यांनी त्रस्त असाल तर गवारीच्या भाजीचं सेवन अवश्य करावं.
हृदयासाठी गुणकारी
गवारीची भाजी आरोग्यासोबतच हृदयासाठी गुणकारी ठरली जाते. यामध्ये आढळून येणार फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवण्यासाठी उत्तम मानलं जातं.
त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी
गवारीची भाजी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. यासाठी गवारीच्या भाजीचा रस करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.
ब्लड प्रेशर
गावारीच्या भाजीमध्ये हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक गुणधर्म हाय ब्लड प्रेशरने पीडित असणाऱ्या लोकांसाठी लाभदायक ठरतं.
गरोदर महिलांसाठी फायदेशीर
गवारीची भाजी गर्भवती महिलांसाठीही अत्यंत लाभदायक ठरते. आयर्न आणि कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करण्यासाठी अनेक गर्भवती महिलांना गवार खाण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच गवारीमधील फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन्स पोटातील बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.