Health: संत्र गुणकारी की भोपळी मिरची भारी?... ठाऊक आहे का यांची खासियत?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 05:38 PM2018-04-03T17:38:45+5:302018-04-03T17:42:15+5:30
'आरोग्यतारा' निवडण्यासाठी झालेल्या रिअॅलिटी शोमध्ये संत्र आणि भोपळी मिरची समोरासमोर आले.
- डॉ. नितीन पाटणकर (मधुमेहतज्ज्ञ)
एकदा फळभाज्यांचा रिॲलिटी शो चालू होता. आरोग्यतारा निवडण्यासाठी स्पर्धा होती. परीक्षक म्हणून एक आहार तज्ज्ञ, एक शेफ आणि एक ब्यूटिशिअन असे तिघेजण होते. तिघेही अतिशय नावाजलेले, आपापल्या व्यवसायात प्रचंड यशस्वी आणि लाखात फी घेणारे अशी ओळख असलेले होते. प्रत्येकाला स्टेजवर येउन आपली ओळख करून देणे, आपण आरोग्यासाठी कसे सरस आहोत हे पटवून देणे आणि मग परीक्षकांनी दिलेले मार्क असा मनोरंजक खेळ होता. प्रत्येक रिॲलिटी शो मधे परीक्षकांची काही ठेवणीतील वाक्य असतात. जसे कोणी म्हणतात, ‘तोडलंस मित्रा’ किंवा ‘वा! इस बात पे एक शेर याद आया’ किंवा ‘ काय एनर्जी आहे मित्रा’ वगैरे वगैरे. तसे या शो मधे पण परीक्षकांची ठेवणीतील वाक्य होती. आहार तज्ञ कुठच्याही फळाला किंवा भाजीला ‘ तुम्ही छानच आहात पण तुम्ही ‘लोकली ग्रो’ व्हायचा प्रयत्न केला पाहिजे’ असा सल्ला देत. शेफ सतत ‘तुमचे गुण छान आहेत पण तुम्ही प्रोटीन्स बरोबर रहायला शिकले पाहिजे’ हे सांगत. ब्यूटिशिअन मात्र ‘माझा सल्ला आहे की तुम्ही स्वतःचे ॲरोमा ऑईल बनवलेत ना तर त्याचा जास्त उपयोग होईल’ असा सल्ला देत.
अशाच एका भागात संत्र आणि भोपळी मिरची समोरासमोर आले. संत्र्याने येऊन खूप छान भाषण केले. ते म्हणाले, ‘माझा रंग लोभसवाणा असतोच. मी खाणाऱ्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवते, मला खाण्याने कोलेस्टेरॉल कमी होते. मला खाण्याने शरीराच्या आतील दाह म्हणजे इनफ्लमेशन कमी होते. त्यामुळे धमनिकाठिण्य म्हणजे atherosclerosis नियंत्रणात राहतो, हृदयविकार होत नाहीत किंवा झाले तर पटकन बरे व्हायला मदत होते. ज्यांना आंबट चवीचा त्रास होत नाही त्यांना संधिवाताचे दुखणे कमी करण्यासाठी पण मी मदत करतो. याच सोबतीने डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी मी उपयोगी ठरतो. हे बोलून संत्रे थांबले. टाळ्यांचा कडकडाट झाला. मान्यवर परीक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. कुणी फ्लाईंग किस पण दिले. मग शो मधील ॲंकर आला. त्याने संत्र्याला मिठी मारली. क्या बात है वगैरे मराठी शो मधील स्टॅंडर्ड प्रतिक्रिया दिली. मग परीक्षकांचे मत विचारले. आहारतज्ञ म्हणाल्या, “फार छान आहेस तू. आता तुला विदर्भातून बाहेर यायला हवे. लोकली प्रोड्यूस्ड अशी तुझी ओळख व्हायला हवी. माझ्या फार्महाउसवर बघ मी तुझी झाडे लावली आहेत. फार छान”. मग ब्यूटीशिअन म्हणाल्या, अरे तू आॅरेंज फेसमास्क वापरतात ते विसरलास.” शेफ म्हणाले, तुला आता प्रोटीन्सबरोबर कसे जायचे याचा शोध घ्यायला हवा.”
या नंतर पाळी होती भोपळी मिरचीची. ती संत्र्यासमोर काही बोलूच शकणार नाही अशी सगळ्यांना खात्री होती पण...
पुढच्या भागात बघू ती काय बोलली ते.