तुळस आरोग्यासाठी गुणकारी; 'हे' आहेत फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 11:44 AM2018-07-05T11:44:51+5:302018-07-05T11:47:38+5:30

हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनाला पवित्र मानले जाते. बऱ्याचदा घरामध्ये एकतरी तुळशीचे रोप लावले पाहिजे असा सल्ला देण्यात येतो. वैज्ञानिकांनीही तुळस फार औषधी असून तिचे मानवी शरिरासाठी अनेक फायदे होत असल्याचे सांगितले आहे.

health benefits of tulsi plant | तुळस आरोग्यासाठी गुणकारी; 'हे' आहेत फायदे!

तुळस आरोग्यासाठी गुणकारी; 'हे' आहेत फायदे!

हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनाला पवित्र मानले जाते. बऱ्याचदा घरामध्ये एकतरी तुळशीचे रोप लावले पाहिजे असा सल्ला देण्यात येतो. वैज्ञानिकांनीही तुळस फार औषधी असून तिचे मानवी शरिरासाठी अनेक फायदे होत असल्याचे सांगितले आहे. तुळशीतील औषधी गुणांमुळे तुळशीचा समावेश औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. तुळशीच्या सेवनाने शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्ट्या व्यक्ती प्रबळ होण्यास मदत होते. तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांदयांचा, मंजीरीचा आणि खोडाचा वापर वेगवेगळया प्रकारे औषधी म्हणून करता येतो. जाणून घेऊयात तुळशीच्या आरोग्यदायी गुणधर्मांबद्दल...

1. ताप - 

ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यानंतर ताप कमी होतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतो. लहान मुलांना ताप आल्यानंतर तुळशीच्या तेलाने मालिश केल्याने ताप कमी करण्यास मदत होते. तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविक आणि वेदनानाशक गुणधर्म असतात. त्यमुळे तुळशीची पाने कच्ची खाल्याने देखील ताप कमी होण्यास मदत होते.

2.  दातांचे आरोग्य राखण्यासाठी -

दातदुखी, कमजोर हिरड्या, दातांतून रक्त येणे, दात किडणे यासर्व गोष्टींसाठी औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो. दररोज 4 ते 5 तुळशीची पाने तोडांत ठेवल्यास चांगला फायदा होतो. आयुर्वेदामध्येही दातांचे आरोग्य राखण्यासाठी तुळस लाभदायी असल्याचे सांगितले आहे. 

3. तोडांच्या दुर्गंधीवर उपाय -

तुळशीच्या पानांचा उपयोग आपण मुखवास म्हणूनही करू शकतो. तोंडातून दुर्गंध येणे, चव नसणे, तोंड कोरडे पडणे यांवर उपाय म्हणून तुळशीची पानांचा उपयोग करू शकतो. 

4. त्वचेची काळजी -

तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात. त्याचप्रमाणे जीवनसत्वे 'अ' आणि 'ब' मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचे संक्रमण, त्वचेवर खाज सुटणे यांसाठी तुळशीच्या पानांचा फार उपयोग होतो. तुळशीचे पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने त्वचा तजेदार आणि टवटवीत होते. तुळशीच्या पानांचा उपयोग चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठीही होतो. तसेच यामुळे चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासही मदत होते.

5. मधुमेहावर नियंत्रण -

तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. 

6. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते -

शरिरातील रोगप्रतिकारक वाढवण्यासाठीही तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात. ज्यांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते. 

Web Title: health benefits of tulsi plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.