टेन्शन वाढलं! जगभरात वेगाने पसरतोय 'हा' जीवघेणा आजार; औषधांनीही रोखणं झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 12:06 PM2024-02-09T12:06:43+5:302024-02-09T12:07:34+5:30
चिंताजनक बाब म्हणजे या संसर्गावर औषधांचा कोणताही परिणाम होत नाही.
अमेरिकेत अतिशय जीवघेण्या इन्फेक्शनचा कहर पाहायला मिळत आहे. फंगल इन्फेक्शन कोरोनापेक्षाही घातक मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते, कॅन्डिडा ऑरिस नावाचा हा संसर्ग लोकांसाठी अत्यंत घातक ठरत आहे. त्यामुळे संसर्ग झालेल्या सुमारे 60 टक्के लोकांचा मृत्यू होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे या संसर्गावर औषधांचा कोणताही परिणाम होत नाही आणि अमेरिकेत त्याचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण जर हा संसर्ग इतर देशांमध्ये वेगाने पसरला तर तो महामारीचे रूप घेऊ शकतो.
कोरोनाच्या प्रादुर्भावातून अजूनही लोक सावरलेले नाहीत आणि त्याच दरम्यान घातक फंगल इन्फेक्शनच्या प्रकरणांमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. अमेरिकन वेबसाइट एनबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार, कँडिडा ऑरिस हे एक रेयर फंगल इन्फेक्शन आहे, परंतु वर्ष 2016 नंतर या प्रकरणांमध्ये सतत वाढत आहेत. या वर्षी हा संसर्ग अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये दिसून आला आहे. या महिन्यात वॉशिंग्टन राज्यातील 4 लोक या जीवघेण्या इन्फेक्शनला बळी पडले.
जेव्हा हा संसर्ग होतो तेव्हा अँटीफंगल औषधं काम करत नाहीत आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना जास्त धोका असतो. चिंतेची बाब म्हणजे, कॅथेटर, ब्रीदिंग ट्यूब किंवा फीडिंग ट्यूब वापरणाऱ्या रूग्णालयातील रुग्णांमध्ये हे आढळून येतं. रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना याचा धोका अधिक असतो. 2009 मध्ये जपानमध्ये कॅन्डिडा ऑरिसची ओळख पटली. त्यानंतर तो अमेरिकेत पोहोचला आणि 2026 पासून या संसर्गाची अनेक प्रकरणे समोर आली.
2020 ते 2021 या काळात कॅन्डिडा ऑरिसची प्रकरणं झपाट्याने वाढली आणि संसर्गाची प्रकरणे 94% वाढली. 2022 मध्ये 2300 हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली. दरवर्षी या संसर्गाची हजारो प्रकरणे नोंदवली जात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कॅन्डिडा ऑरिस संसर्गाची प्रकरणं आतापर्यंत 40 देशांमध्ये नोंदवली गेली आहेत. हा संसर्ग खुल्या जखमा आणि फुफ्फुसांना संक्रमित करू शकतो. यामुळे मृत्यू होऊ शकतो. या इन्फेक्शनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.