Health Care: ऋतुमानानुसार आपल्या आहारात बदल कराल, तर आजारी कमी पडाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 01:30 PM2024-06-11T13:30:40+5:302024-06-11T13:31:47+5:30
Health Care Tips: नुकताच ज्येष्ठ मास सुरु झाला आणि पावसाचीही सुरुवात झाली, सृष्टीत होणाऱ्या या बदलांसाठी शरीराची साथ मिळावी म्हणून दिलेले नियम पाळा!
पावसाळा सुरु होतो ना होतो, लगेच सर्दी खोकल्याचे आवाज, बामाचे वास आणि दवाखान्याबाहेर रांगा सुरू होतात. याचं कारण म्हणजे आपली इम्युनिटी अर्थात रोग प्रतिकार शक्ती कमकुवत झाली आहे. ती सुदृढ करण्यासाठी ऋतुमानानुसार आहारात आवश्यक बदल केले पाहिजेत. म्हणून पुढे दिलेले आहार नियम पाळा आणि आजार टाळा.
चैत्र (मार्च-एप्रिल) – या महिन्यात गुळाचे सेवन करा. कारण गुळामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि तुमचे रक्त शुद्ध होते. अनेक रोगांपासून रक्षण होते. चैत्र महिन्यात कडुलिंबाची ४-५ मऊ पानेही रोज वापरावीत. कडुलिंबाची पाने चघळल्याने शरीरातील दोष दूर होतात.
वैशाख (एप्रिल-मे)- वैशाख महिन्यात उन्हाळा सुरू होतो. या महिन्यात बेल पत्राचा अवश्य वापर करावा, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. वैशाख महिन्यात तेलकट पदार्थ कमी खा, कारण त्यामुळे तुमचे शरीर ते पचवू शकत नाही.
ज्येष्ठ (मे-जून) – हा महिना भारतातील सर्वात उष्ण आहे. ज्येष्ठ महिन्यात दुपारी झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, थंड ताक, लस्सी, ज्यूस आणि शक्य तेवढे पाणी सेवन करावे. शिळे अन्न, जड अन्न आणि गरम पदार्थ खाऊ नका. कारण ते आजाराला आमंत्रण ठरते.
आषाढ (जून-जुलै) – आषाढ महिन्यात आंबा, जुना गहू, सत्तू, जव, तांदूळ, खीर, थंड पदार्थ, काकडी इत्यादींचा वापर करा आणि पावसाळा सुरु झाल्यामुळे तेलकट पदार्थ चालू शकतील पण त्याचा अतिरेक झाला तर पोटबिघाड होईल.
श्रावण (जुलै-ऑगस्ट) – श्रावण महिन्यात फळभाज्यांवर भर द्या. पालेभाज्या आणि दुधाचा वापर कमी करा. अन्न सेवनाचे प्रमाण कमी करा - जुना तांदूळ, जुना गहू, खिचडी, दही आणि पचायला हलके अन्न घ्या.
भाद्रपद (ऑगस्ट-सप्टेंबर) – या महिन्यात हलके आणि सहज पचणारे अन्न खावे, पावसाळ्यामुळे पचनशक्तीही मंदावते, त्यामुळे सहज पचणारे अन्न खा. या काळात उत्सव असल्याने गोड धोड खाताना पथ्य सांभाळा आणि प्रमाणात खा.
आश्विन (सप्टेंबर-ऑक्टोबर) – या महिन्यात दूध, तूप, गूळ, नारळ, सुकी द्राक्षे, कोबी इत्यादींचे सेवन करू शकता. हे जड अन्न आहे पण तरीही या महिन्यात पचते कारण या महिन्यात आपली पचनशक्ती मजबूत असते.
कार्तिक (ऑक्टोबर-नोव्हेंबर) – कार्तिक महिन्यात गरम दूध, गूळ, तूप, साखर, मुळा इत्यादींचा वापर करा. थंड पेये वापरणे थांबवा. ताक, लस्सी, थंड दही, थंड फळांचा रस इत्यादी सेवन करू नका, यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
पौष (डिसेंबर-जानेवारी) – या ऋतूत दूध, पनीर, खवा, गोंद लाडू, गूळ, तीळ, तूप, बटाटा, आवळा इत्यादीपासून बनवलेले पदार्थ खावेत, या गोष्टी तुमच्या शरीराला स्निग्धता देतील. थंड अन्न, शिळे अन्न पचण्यास जड जाईल.
माघ (जानेवारी-फेब्रुवारी) – या महिन्यात तुम्ही गरम आणि जड अन्नही घेऊ शकता. तूप, नवीन धान्य, गोंड लाडू इत्यादींचा वापर करता येतो.
फाल्गुन (फेब्रुवारी-मार्च) – या महिन्यात गुळाचा वापर करा. सकाळी योगासने आणि आंघोळीचा नित्यक्रम करा. हरभरा वापरू नका.