Health Care Tips: आपण रोज जेवतो, पण निरोगी आयुष्यासाठी जेवणाचे 'हे' नियम पाळतो का? स्वतःलाच उत्तर द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 07:00 AM2022-07-29T07:00:00+5:302022-07-29T07:00:10+5:30
Health : आपण सेवन करत असलेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर व्हावे यासाठी स्वतःला शिस्त लावून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही महत्त्वाचे नियम-
'हेल्थ इज वेल्थ' अर्थात आरोग्य हीच संपत्ती आहे. आपले मन भगवंताच्या चरणी रुजू करायचे असेल, तर आरोग्याच्या कुरबूरी असून चालणार नाही. आरोग्य सुदृढ असेल, तर मन शांत राहील. यासाठी सर्व संतांनीदेखील आध्यात्माबरोबर आरोग्याला महत्त्व दिले. समर्थ रामदासांनी तर हनुमंताची देवळे उभारून त्याच्या शक्ती, युक्ती आणि भक्तीचा आदर्श घालून दिला. युवकांनी तर बलोपासना केलीच पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. आजचा समाज सशक्त आणि सुसंस्कृत घडवायचा असेल, तर व्यायाम, आध्यात्म याबरोबरच आपण जे अन्नग्रहण करतो, त्याबाबतीत महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत.
- ताजे अन्न खावे.
- मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट या सहाही चवी जेवणात असाव्यात.
- जेवणात चावून, फोडून खाण्यासारखे पदार्थ, चाटण्यासारखे, पिण्यासारखे पातळ पदार्थ याा समावेश असावा.
- भूक लागल्यावरच जेवावे.
- दोन जेवणांमध्ये किंवा खाण्यामध्ये किमान चार तासांचे अंतर असावे.
- प्रत्येक घास चावून खावा.
- जेवणात अधून मधून घोट घोट पाणी प्यावे.
- जेवण तिखट, कडू, तुरट चवींनी संपवावे.
- जेवण आंबट, गोड चवींनी सुरू करावे.
- योग्य न्याहारी आणि दुपारचे जेवण घ्यावे. रात्रीचे जेवण हलके घ्यावे.
- जेवताना काटेचमच्यांनी न जेवता हाताने जेवावे.
- जेवणाआधी ईश्वराचे स्मरण करावे आणि सकस अन्न दिल्याबद्दल त्याचे आभार मानावेत.
- जेवण झाल्यावर ताटात एक थेंब सोडून आचमन करून भोजनयज्ञ पूर्ण करावा.
- गोड आणि पचायला जड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत.
- खाण्याच्या क्षमतेसनुसार दोन भाग घन द्रव्य, एक भाग पातळ द्रव्य, एक भाग मोकळा असे ताटाचे स्वरूप असावे.
- शांतचित्ताने, न बोलता, सावकाश जेवून ताटाला नमस्कार करून मगच उठावे.