Health: उपवासामुळे महिलांच्या प्रजनन शक्तीत घट?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 06:26 AM2022-11-14T06:26:05+5:302022-11-14T06:26:27+5:30
Health Tips: सांगा, तुमच्यापैकी कोण कोण उपवास करतं? आजकाल अनेक पुरुषही उपवास करीत असले तरी उपवास करणाऱ्यांत महिलांचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे. भारतात तर उपवास करण्यासाठी अनेक कारणं आहेत.
सांगा, तुमच्यापैकी कोण कोण उपवास करतं? आजकाल अनेक पुरुषही उपवास करीत असले तरी उपवास करणाऱ्यांत महिलांचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे. भारतात तर उपवास करण्यासाठी अनेक कारणं आहेत. बऱ्याच महिला आठवड्यातून एक दिवस तरी उपवास करतात. काही महिला कोणत्या ना कोणत्या कारणानं कधी सोमवार, कधी शुक्रवार, कधी शनिवार, कधी चतुर्थी, कधी एकादशी... असे अनेक उपवास करतात. धार्मिक सणांच्या निमित्तानं, तसंच अनेकजण वजन कमी करण्यासाठीही उपवास करतात.
सध्याच्या काळात अगदी पूर्ण दिवस उपवास केला नाही तरी ‘इंटरमिटेन्ट फास्टिंग’चा बोलबाला आहे. इंटरमिटेन्ट फास्टिंग म्हणजे दिवसातला फक्त काही वेळच उपवास करायचा. फक्त त्याच वेळी तुम्ही खायचं. इतर वेळी इतर कोणताही अन्नपदार्थ तोंडात टाकायचा नाही. या पद्धतीत तुम्ही काय खाता यापेक्षा केव्हा खाता यावर जास्त भर दिला जातो. समजा दिवसाचे दोन भाग केले, तर त्यातल्या ठराविक चार-पाच तासांतच तुम्हाला जे काही खायचं असेल ते खाता येईल. त्यामुळे तुमचं आरोग्य सुधारतं, असं अनेकांचं म्हणणं आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकांना याचा फायदा झाला, पण सततच्या उपवासामुळे याचा काहीजणांना तोटाही झाला. विशेषत: महिलांना. बऱ्याच महिलांचं वजन तर कमी झालं, पण त्याचबरोबर त्यांच्या शरीरातील आवश्यक हार्मोन्सचं प्रमाणही बऱ्यापैकी घटलं.
अमेरिकेच्या इलिनॉइस विद्यापीठाच्या संशोधकांनी यासंदर्भात नुकतंच एक संशोधन केलं. स्त्री आणि पुरुषांच्या लठ्ठपणाचा अभ्यास, त्याची कारणं, उपाय यासंदर्भात संशोधन करताना उपवास करणारे आणि न करणारे या एका मुद्याकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. त्यावर त्यांनी अधिक संशोधन केलं. त्यांच्या लक्षात आलं की, कारण कुठलं का असेना, पण उपवास करणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा बरंच जास्त आहे. बऱ्याच महिला दिवसाचे काही तास उपवास करतात. दिवसात साधारण १२ ते १६ तास त्या काहीही खात नाहीत. या काळात काहीही न खाल्ल्यामुळे महिलांच्या वजनात घट तर त्यांना दिसून आली, पण ही घट सकारात्मक नव्हती. म्हणजे या वजन घटीबरोबर काही दुष्परिणामही त्यांना दिसून आले. त्या महिलांना मात्र आपलं वजन कमी झालं याचाच फार आनंद होता.
या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. ज्या महिलांना अजून रजोनिवृत्ती आलेली नाही आणि ज्या महिलांना रजोनिवृत्ती आलेली आहे, अशा महिला त्यांनी आपल्या अभ्यासासाठी निवडल्या. या साऱ्याच महिला लठ्ठपणाच्या शिकार होत्या. मुख्य म्हणजे यातील बऱ्याच महिला इंटरमिटेंट फास्टिंगही करीत होत्या.
प्रयोगातील या महिलांना आठ आठवड्यांसाठी इंटरमिटेंट फास्टिंग करण्यास सांगण्यात आलं. त्यानुसार या महिलांना दिवसातून ठराविक चार तासांतच खाण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे दिवसातील इतर वीस तास उपवास! संशोधकांनी या साऱ्या महिलांचा, त्यांच्या शरीरावर होणाऱ्या बदलांचा, त्यांच्या वजनातील फरकाचा बारकाईनं अभ्यास केला. या महिलांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची तपासणी त्यांनी केली. संशोधकांच्या लक्षात आलं, उपवासामुळे या महिलांच्या वजनावर तर तात्पुरता परिणाम दिसून येतो. पण त्यांच्यातल्या प्रजननक्षम हार्मोन्सचं मात्र दीर्घकालीन नुकसान होतं. उपवासामुळे प्रजननासाठी आवश्यक असणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाण तब्बल १४ टक्क्यांनी कमी होतं. त्यामुळे महिलांचं प्रजनन आरोग्य बिघडतं असा त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे.
संशोधकांचं म्हणणं आहे, उपवासाचे फायदे होत नाहीत असं नाही. पण कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते. त्या मर्यादेत कोणतीही गोष्ट केली तर त्याचे फायदे होतात. मर्यादा जर ओलांडली गेली तर मात्र त्याचे दुष्परिणामच अनुभवायला मिळतात. उपवासाच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू होते. तात्पुरता फायदा तुम्हाला आनंद देईलही, पण दीर्घ काळात त्याचे दुष्परिणामच आपल्याला दिसून येणार असतील तर त्याबाबत आपणच गांभीर्यानं विचार करायला हवा. या महिलांना अधिक आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
भावी पिढीसाठी चिंतेची बाब!
संशोधनात सामील झालेल्या क्रिस्टा वराडी यांचं म्हणणं आहे, रजोनिवृत्तीनंतर असंही महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन या हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं. त्यात डिहायड्रोएपियान्ड्रोस्टेरॉन (DHEA) या हार्मोन्सचं प्रमाणही कमी होणं महिलांसाठी जास्त धोकादायक आहे. महिलांच्या शरीरात सर्व अत्यावश्यक अन्नघटक गेलेच पाहिजेत. अन्यथा येणाऱ्या पिढीसाठीही ती चिंतेची बाब ठरू शकते. संशोधनात या महिलांमध्ये त्वचेतील नकारात्मक किंवा इतर काही धोकादायक बदल दिसून आले नाहीत.