Health: बसल्याबसल्या पाय हलवता? - उत्तम!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 08:27 AM2023-09-11T08:27:46+5:302023-09-11T08:29:07+5:30

Health: तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये बसलेले आहात. काम करता आहात किंवा नुसतेच बसलेले आहात. अशावेळी तुम्ही काय करता? उगाचंच हातपाय हलवत असता? केसांशी चाळा करत असता? खुर्ची गोल गोल फिरवत असता? किल्ली गरगर फिरवत असता?...

Health: Do you move your legs while sitting? - Great! | Health: बसल्याबसल्या पाय हलवता? - उत्तम!

Health: बसल्याबसल्या पाय हलवता? - उत्तम!

googlenewsNext

तुम्ही घरात किंवा ऑफिसमध्ये बसलेले आहात. काम करता आहात किंवा नुसतेच बसलेले आहात. अशावेळी तुम्ही काय करता? उगाचंच हातपाय हलवत असता? केसांशी चाळा करत असता? खुर्ची गोल गोल फिरवत असता? किल्ली गरगर फिरवत असता?...
दुसरं उदाहरण घेऊ. समजा तुम्हाला मोबाइलवर एखाद्याचा कॉल आला, तेव्हा तुम्ही बसल्या जागीच समोरच्या व्यक्तीशी बोलता की फोनवर बोलत असतानाच चकराही मारत असता? हातवारे करत असता? 

अनेकजण नक्कीच काही ना काही चाळा करत असतील. त्यामुळे घरातल्या लोकांची बोलणीही त्यांनी खाल्ली असतील की, ‘अरे, काय हे ‘वेडे चाळे? नीट एका जागी बसून बोलता येत नाही का? शांतपणे बसून काम करता येत नाही का? हे असे चाळे करताना किती विचित्र दिसतं,’ वगैरे... 
आपणही आपल्या घरातल्या मुलांना बऱ्याचदा याबद्दल सांगत असतो आणि त्यांची कानउघाडणी करत असतो. पण संशोधकांचं म्हणणं आहे, तुम्ही घरात असा किंवा घराबाहेर, काही काम करत असा किंवा काहीही करत नसा, तुम्ही जर हे असे ‘वेडे चाळे’ करत असाल तर तुमच्या प्रकृतीसाठी ते चांगलंच आहे! 

त्यातही तुम्ही जर कोणताही व्यायाम करत नसाल, एखादा खेळ खेळत नसाल, शारीरिक हालचाल फारशी होत नसेल आणि  जीवनशैली बैठी असेल, तर विचित्र वाटणाऱ्या अशा शारीरिक हालचालींचे चाळे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात! कारण तुमच्या शरीरातली चरबी आणि कॅलरी घटण्यासाठी या हालचालींचा उपयोग होऊ शकतो! 

अशा प्रकारच्या हालचाली म्हणजे एक प्रकारचा व्यायामच आहे. त्याला ‘फिजटिंग’ म्हटलं जातं. त्यामुळे आपलं शरीर सक्रिय राहतं आणि विविध प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासही या हालचाली उपयुक्त ठरू शकतात. ज्या व्यक्ती कायम सक्रिय असतात, ज्यांच्या शरीराची हालचाल होत असते, अशा व्यक्ती दीर्घकाळ जगतात, असं विज्ञान सांगतं. ज्या व्यक्तींनी आपल्या वयाची नव्वदी किंवा शंभरी गाठली आहे किंवा त्याहीपुढे ज्यांच्या आयुष्याची दोरी टिकली आहे, अशा व्यक्तींचा अभ्यास केला, त्यांची जीवनशैली तपासली तर लक्षात येतं, असे लोक त्यांच्या आयुष्यात कायमच क्रियाशील राहिलेले आहेत! पण फक्त कार्यरत असलं म्हणजेच आपलं आयुष्य वाढतं असं नाही, त्यासाठी इतर अनेक घटकही कारणीभूत असतात. मात्र, काहीही न करण्यापेक्षा, आपलं बूड एकाच जागी टेकवून ठेवण्यापेक्षा आपल्या शरीराची, अवयवांची हालचाल होत असेल, तर त्याचा शेवटी फायचाच होतो. अर्थात या हालचाली व्यायामाला पर्याय आहेत, असंही नाही.

लीड्स युनिव्हर्सिटीचे आहारतज्ज्ञ जेनेट कॅड यांचं म्हणणं आहे, ‘जे कोणी लोक आपले दैनंदिन व्यवहार करताना अशा प्रकारच्या हालचाली, चाळे करतात, त्यांच्याकडे चांगल्या नजरेनं पाहिलं जात नाही. ते अशिष्ट समजलं जातं. असे लोक फार चंचल असतात, अशीही बिरुदावली त्यांना लावली जाते. याशिवाय ते मनातून घाबरलेले असतात. लोक बोलतात, त्याकडे अशा लोकांचं लक्ष नसतं, असंही म्हटलं जातं. त्यात तथ्य असेलही, पण या शारीरिक चाळ्यांचा त्यांना शारीरिक, मानसिकदृष्ट्या फायदा होतो.’ 

यासंदर्भात नुकताच झालेला अभ्यास सांगतो, तुम्ही बसल्या जागी हलत-डुलत असलात, तर नुसतं बसलेलं असण्यापेक्षा  २९ टक्के जास्त कॅलरीज खर्च होतील. तेच जर तुम्ही उभं राहून हातापायांचे चाळे करत असाल, तर  ३८ टक्के जास्त कॅलरीज  खर्च होतील! 
यासंदर्भात अलीकडेच काही वेगवेगळे अभ्यास झाले आहेत. एका अभ्यासात काही सहभागींना काही गणितं सोडविण्यासाठी देण्यात आली. पण जे लोक गणितं सोडवताना हातापायांच्या हालचाली करत होते, केसांशी, पेनशी चाळा करत होते, त्यांना तुलनेनं कमी टेन्शन असल्याचं लक्षात आलं. 
दुसऱ्या एका अभ्यासात काही लुकड्यासुकड्या, हडकुळ्या, अशक्त लोकांना अतिरिक्त १००० कॅलरीचे पदार्थ खाऊ घातले गेले. जे लोक हे पदार्थ खात असताना ‘फिजटिंग’ करत होते, त्यांच्या शरीरात चरबी जमा होण्याचं प्रमाण कमी होतं.

टेनिसपटू जमिनीवर बॉल का आपटतात? 
टेनिस खेळणाऱ्या खेळाडूंचं तुम्ही कधी निरीक्षण केलंत? सर्व्हिस करण्याआधी बऱ्याचदा ते चेंडू जमिनीवर आपटतात. खरंतर हा काही खेळाचा नियम नाही, पण असं केल्यानं खेळामधली त्यांची एकाग्रता वाढते! कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे न्युरोसायंटिस्ट मॅकस मेलिन यांचं म्हणणं आहे, ‘कायम स्वस्थ, बूड टेकवून बसून राहणं हे केवळ तुमच्या शरीरासाठीच नव्हे तर मेंदूसाठीही अतिशय घातक आहे. काही ना काही करत राहणं तुमच्या शरीर-मनालाही कायम ताजंतवानं ठेवत असतं.’

Web Title: Health: Do you move your legs while sitting? - Great!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.