Health: झोपेतून उठून मध्यरात्री फ्रीज उघडता का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 06:09 AM2022-06-23T06:09:06+5:302022-06-23T06:09:29+5:30
Health: तुमची खाण्यापिण्याची गडबड आहे? - म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा अनियमित, विचित्र, काहीशा अनैसर्गिक आहेत? म्हणजे रात्री उशिरा खाणं, रात्रीच भूक लागणं, इतर वेळी भूक नसल्यासारखं वाटणं, साधारण मध्यरात्री भुकेची जाणीव होणं..
तुमची खाण्यापिण्याची गडबड आहे? - म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा अनियमित, विचित्र, काहीशा अनैसर्गिक आहेत? म्हणजे रात्री उशिरा खाणं, रात्रीच भूक लागणं, इतर वेळी भूक नसल्यासारखं वाटणं, साधारण मध्यरात्री भुकेची जाणीव होणं.. तरुण-तरुणींपैकी अनेक जण म्हणतील, यात काय अनैसर्गिक आहे? आम्ही मित्रमंडळी याच वेळी तर ‘जेवायला’ बसतो. कारण, याच वेळी आम्हाला भूक लागते.. पण असं जर तुमच्याबाबतीत होत असेल, तर ती धोक्याची मोठी घंटा आहे, असं नक्की समजा.
अनेक जण तर अगदी मध्यरात्री बारा किंवा त्यानंतर आपल्या फ्रीजचा दरवाजा उघडतात, त्यात काय काय ‘खाणेबल’ आहे, याची शोधाशोध करतात. त्यावरही ताण म्हणजे काही जणांना तर रात्री मध्येच केव्हातरी जाग येते आणि अशा मध्यरात्रीही आपल्या फ्रीजचा दरवाजा ते उघडतात, आपल्या आवडीचा खाण्याचा पदार्थ शोधतात.. खरं तर आपल्या आवडीचे पदार्थ त्यांनी आधीच फ्रीजमध्ये ठेवलेले असतात, ते काढतात, खातात आणि मग झोपतात! (अप)रात्री असं काही तरी खाल्ल्याशिवाय त्यांना झोपही लागत नाही.
तुमच्याही बाबतीत होतंय असं? किंवा तुम्हीही असं काही करीत असाल, तर त्यातून वेळीच बाहेर या. तुम्हाला वाटत असलं, तरी ही गोष्ट ‘नॉर्मल’ नाही, हे आधी लक्षात घ्या. कारण, यामुळे निद्रानाशाचा त्रास तुमच्या बोकांडी बसू शकतो. हा त्रास हळूहळू वाढत जाऊ शकतो आणि इतरही अनेक आजारांना तो निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे रात्री-बेरात्री खाणं, रात्री जागवणं.. या गोष्टी अनेक जण करताना दिसत असतील तरी त्या ‘काॅमन’, नाॅर्मल आहेत, असं समजून त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
संशोधकांचं तर म्हणणं आहे, हे एक दुष्टचक्र आहे. तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा ‘नैसर्गिक’ नसल्या तर वेळी-अवेळी तुम्हाला भूक लागणार. त्यावेळी काहीतरी तुम्ही तोंडात कोंबणार. त्यामुळे झोपेचं खोबरं होणार. व्यवस्थित झोप न झाल्यामुळे मानसिक तक्रारी वाढत जाणार.. एकामुळे दुसरं आणि दुसऱ्यामुळे तिसरं असं होत शेवटी तुमच्या आरोग्याचेच बारा वाजणार! त्यामुळे आपल्या खाण्याच्या वेळी रात्रीचे बारा वाजणार नाहीत आणि मध्यरात्री फ्रीजही उघडला जाणार नाही, याची नक्की काळजी घ्या..