Health : जाणून घ्या मूर्च्छा येण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 06:31 AM2022-01-30T06:31:29+5:302022-01-30T06:31:55+5:30

Health: मेंदूला अचानक रक्तपुरवठा कमी झाल्याने मूर्च्छा म्हणजे चक्कर येऊन अनेक जण खाली पडतात. ही स्थिती काही सेकंद किंवा मिनिटांसाठी असते. त्यानंतर संबंधित व्यक्ती सामान्य होतो. तर, काही व्यक्ती काही वेळेसाठी बेशुद्धावस्थेत जातो.

Health: Find out the cause of fainting | Health : जाणून घ्या मूर्च्छा येण्याचे कारण

Health : जाणून घ्या मूर्च्छा येण्याचे कारण

googlenewsNext

- डॉ. जय देशमुख
(एमडी, एफसीपीएस,एमएनएएमएस)
मेंदूला अचानक रक्तपुरवठा कमी झाल्याने मूर्च्छा म्हणजे चक्कर येऊन अनेक जण खाली पडतात. ही स्थिती काही सेकंद किंवा मिनिटांसाठी असते. त्यानंतर संबंधित व्यक्ती सामान्य होतो. तर, काही व्यक्ती काही वेळेसाठी बेशुद्धावस्थेत जातो. 

मूर्च्छित होणे ही चिंतेची बाब आहे का?
बहुतेक लोकांसाठी ही चिंतेची बाब ठरत नाही. परंतु पुन्हा-पुन्हा हा प्रकार होत असल्यास किंवा इतर काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवे.
मूर्च्छित होण्यापूर्वी चेतावणी देणारी लक्षणे कोणती?
कधीकधी एखाद्या व्यक्तीला अचानक थंडी आणि घाम येऊ शकतो. काही वेळेसाठी सूचनेनासे होऊ शकते. कधीकधी गरम वाटू शकते. अत्यंत थकवा, मळमळ आणि खूप तणावाची भावनादेखील मूर्च्छित होण्याची पूर्वसूचना असू शकते. अशावेळी अचानक व्यक्ती खाली पडू शकतो. तीव्र डोके दुखी होऊ शकते. दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. कानात आवाज येऊ शकतो आणि स्नायूवर नियंत्रण गमावल्यासुद्धा जाऊ शकतात.
मूर्च्छित होण्याची काळजी कधी करावी?
काहीवेळा मूर्च्छा येणे हे अंतर्गत वैद्यकीय समस्येचे लक्षण असू शकते. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधणे अधिक चांगले. यातून नेमके कारण कळते आणि उपचार करता येतात.
मूर्च्छित होण्याची चिंताजनक कारणे कोणती?
सामान्यत: रक्तदाब कमी झाल्यामुळे मूर्च्छा येते. मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि तुमची चेतना कमी होते. काहीवेळा पोटात किंवा आतड्यांमध्ये किंवा शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी असलेल्या महाधमनीमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळेसुद्धा येऊ शकतो. हृदयाचे असे अनेक आजार आहेत ज्यामुळे मूर्च्छा येऊ शकते. हे सहसा ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. यामध्ये हृदयातील रक्त गोठणे, अनियमित हृदयाचे ठोके, खूप वेगवान किंवा अतिशय मंद हृदयाचे ठोके, हृदयाच्या झडपाचे, विशेषत: महाधमनी वाल्वचे अरुंद होणे आदींचा समावेश असतो.
बेशुद्धीमुळे मृत्यू होऊ शकतो का? कमी किंवा वेगवान हृदयाचा ठोका यामुळे मूर्च्छा येणे ही सर्वात चिंताजनक बाब आहे. हृदयाच्या गतीतील बदल हा सर्वात चिंताजनक ठरतो. याला ‘वेंट्रिक्युलर टाकीकार्डिया’ किंवा ‘वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन’ म्हणतात. ‘वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन’मध्ये, तुम्ही चार किंवा पाच सेकंदांसाठी चेतना गमावता. श्वासोच्छवास थांबतो आणि हृदयाचे ठोके बंद पडतात. याला ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ म्हणतात. जर एखाद्याने ‘ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर’सह (एईडी) हृदयाचे ठोके ताबडतोब सामान्य केले नाही तर अशा परिस्थितीत बाधित व्यक्ती १० मिनिटांच्या आत मरू शकतो. ९५ टक्के प्रकरणांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका घातक ठरतो.
अचानक हृदयविकाराची कारणे कोणती आहेत?
आधीच्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे हृदयाला झालेली जखम, हृदयविकारावर योग्य उपचाराचा अभाव, ‘लो इजेक्शन फ्रेक्शन’, कुटुंबात कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याचा इतिहास आणि धूम्रपान ही प्रमुख कारणे आहेत. यापैकी कोणतेही कारण असल्यास, तुमचे डॉक्टर ईसीजीद्वारे हृदयाची स्थिती जाणून घेतात. तुम्हाला अचानक ह्रदयविकाराचा धोका असल्यास ‘इम्प्लांटेबल कार्डिओव्हर्टर डिफिब्रिलेटर’ (आयसीडी) जीव वाचवणारा ठरू शकतो. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा ‘आयसीडी’ काही सेकंदात हृदयाचे ठोके नियंत्रित करते.
मूर्च्छीत होण्याचे सर्वात सामान्य कारण कोणते?
लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकांमध्ये ‘वेसोवेगल सिंकोप’ असतो. बेशुद्ध होण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे. अनेकवेळा ‘डिहायड्रेशन’ मुळे किंवा अधिक वेळ उभे राहिल्याने सुद्धा होऊ शकते. तर काहींना रक्त पाहिल्यानंतर, इंजेक्शनमुळे, चाचणीसाठी रक्त काढताना, अचानक उभे राहिल्याने, बराच वेळ सरळ उभे राहिल्याने, अचानक धक्का बसल्याने, तणावामुळे, तीव्र वेदनांमुळे किंवा रक्तदानामुळे सुद्धा मूर्च्छा येऊ शकते.
परिस्थितीजन्य बेशुद्धी म्हणजे काय?
काहीवेळा श्रम किंवा व्यायामानंतर येणारा खोकला, शिंकणे, हसणे किंवा छातीवर दाब आल्यानेही मूर्च्छा येते. वजन उचलताना किंवा उभे राहून लघवी करताना देखील येऊ शकते.
एखादी व्यक्ती बेशुद्ध पडल्यावर काय करावे?
बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीचे हृदयाचे ठोके तपासून त्याचे पाय उचलायला हवे. काही वेळानंतर त्याची कुस बदलायला हवी. एक-दोन मिनिटात शुद्ध आली नाही तर त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवे. मूर्च्छीत होण्याचे कारण तपासण्यासाठी ईसीजी, एक्सरसाइज स्ट्रेट टेस्ट, इकोकार्डियोग्राम, रक्तदाबासह तपशीलवार शारीरिक तपासणी केली जाते. उभे राहून आणि ‘टिल्ट टेबल टेस्ट’द्वारेही रक्तदाब तपासला जातो.

Web Title: Health: Find out the cause of fainting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.