Health: हे उपाय करा आणि अंथरुणावर पडताच २ मिनिटांत शांत झोपा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:16 AM2022-02-03T06:16:20+5:302022-02-03T06:16:51+5:30
Health: झोप ही आपल्या शरीरमनासाठी किती आवश्यक आहे, हे नव्यानं सांगायची आवश्यकता नाही; पण ही झोप यावी कशी? अनेक जण रात्री बिछान्यावर झोपतात तर खरं; पण डोळे टक्क उघडे आणि नजर आढ्याकडे! रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर करत झोपेची आराधना!
झोप ही आपल्या शरीरमनासाठी किती आवश्यक आहे, हे नव्यानं सांगायची आवश्यकता नाही; पण ही झोप यावी कशी? अनेक जण रात्री बिछान्यावर झोपतात तर खरं; पण डोळे टक्क उघडे आणि नजर आढ्याकडे! रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर करत झोपेची आराधना!
शांतपणे आणि पटकन झोप यायला हवी असेल, तर काय करायचं? काही घरगुती आणि सोपे उपाय आहेत, ते करून पाहा. सवय झाली की, अगदी दोन मिनिटांत तुमच्या पापण्या जड होतील आणि तुम्ही निद्रादेवीच्या अधीन व्हाल. अर्थात, हा उपाय नवीन नाही; पण काही दिवस तो चिकाटीनं केला मात्र पाहिजे.
त्यासाठी काय कराल?
१) आपल्या नेहमीच्या वेळेला (खूप लवकर नाही आणि खूप उशिरा नाही.) झोपायला जा.
२) झोपण्याच्या जागी शक्यतो प्रखर प्रकाश आणि आजूबाजूला गडबड नको.
३)अंथरुणावर पडल्यावर डोळे बंद करून हळूहळू आणि दीर्घ श्वसन करा.
४) संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. आपल्याला जणू काही वजनच नाही, असा वजनरहित अनुभव घेण्याचा प्रयत्न करा.
५) मनातले सर्व विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करा. फक्त श्वासावर मन केंद्रित करा.
६) शरीरातील सर्व ताण हळूहळू निघून जातो आहे, सर्व स्नायू शिथिल होताहेत, अशी कल्पना करा.
७) शरीराचा वरील भाग रिलॅक्स करा. डोकं, चेहरा, जबडा, कपाळ, डोळे, छाती, पाठ, हात.
८) त्यानंतर खालील भाग ताणरहित करा. नितंब, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, पायांची बोटं.
९) आता एकाच वेळी आपलं संपूर्ण शरीर ताणरहित झालं आहे, याचा अनुभव घ्या. या अवस्थेत किमान दहा सेकंद थांबा.
१०) मनातले विचारही हळूहळू कमी झाले आहेत आणि आपल्याला शांत वाटतंय याचा अनुभव तुम्हाला येईल.
११) एखाद्या आनंदी प्रसंगाचं चित्र आपल्या मनासमोर उभं करा. मन भरकटू नये यासाठी मनाला स्वयंसूचना देत राहा.
ज्यांना लवकर झोप येत नाही, त्यांनी काही दिवस नेटानं हा अभ्यास सुरू ठेवावा. शरीर-मनावर त्याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसेल. काही दिवसांतच अंथरुणावर पडल्या पडल्या अगदी दोन मिनिटांतच गाढ, शांत झोपेचा अनुभवही तुम्ही घेऊ शकाल.