HEALTH : उन्हाळ्यात लिंबूचे सेवन आरोग्यदायी !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 12:47 PM2017-03-22T12:47:42+5:302017-03-22T18:17:42+5:30
‘क’ जीवनसत्वाचा खजिना असलेले लिंबू हे फळ त्वचेला आतून पोषण देऊन तुमच्या चेहऱ्यावर तेज आणते.
उन्हाळ्याची चाहूल लागली असून शरीराला गारवा मिळण्यासाठी बहुतांश लोकं शीत पेयांकडे धाव घेतात. यासाठी रस्त्यावर सगळीकडे पन्हे व लिंबूपाणी विकणाऱ्याची गर्दी दिसत असते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात लिंबूचे सेवन आरोग्यदायी असल्याने रोज लिंबूपाणी घेऊ शकता. यामुळे तृप्त झाल्यासारखे वाटते. शिवाय ‘क’ जीवनसत्वाचा खजिना असलेले लिंबू हे फळ त्वचेला आतून पोषण देऊन तुमच्या चेहऱ्यावर तेज आणते. लिंबूपाणी पिण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. या व्यतिरिक्त लिंबाचे अनेक फायदे असून त्याबाबत जाणून घेऊया.
वजन कमी होण्यास मदत
कोमट पाण्यात लिंबाचा रस व मध मिसळून पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
अँटीबायोटिक गुण
लिंबामुळे मलेरिया, कॉलरा, डिप्थेरिया, टायफॉईड व इतर जीवघेणे आजार निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
अंतर्गत रक्तस्राव थांबतो
लिंबामध्ये अँटिसेप्टिक गुण असल्याने त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव थांबतो. नाकातून रक्त येत असल्यास कापसाच्या बोळ्यावर लिंबाचा रस घेऊन नाकात ठेवा. यामुळे नाकातून रक्त येणे थांबते.
दात दुखणे थांबते
दात दुखत असलेल्या ठिकाणी ताज्या लिंबाचा रस लावल्याने दुखणे थांबते. हिरड्यांवर लिंबाच्या रसाने मसाज केल्याने हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव थांबतो.
केसांच्या समस्या दूर होतात
केसांसाठी लिंबू किती गुणकारी आहे हे आपणास माहित आहे. कोंडा, केस गळणे व इतर समस्यांसाठी केसांच्या मुळाशी लिंबाचा रस लावतात. लिंबामुळे केस चमकदार बनतात.