Health News: सिगारेटमुळे दृष्टी जाण्याचा धोका, अमेरिकेतील संशोधनाचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:36 AM2022-04-04T07:36:45+5:302022-04-04T07:43:21+5:30
Health News: धूम्रपानामुळे शरीरावर होणारे गंभीर परिणाम होतात, आता सर्वज्ञात आहे. मात्र, सिगारेट किंवा ई-सिगारेटच्या व्यसनामुळे डोळ्यांवर परिणाम होऊन दृष्टी गमावण्याचा धोका संभवतो किंवा काचबिंदूही होऊ शकतो, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका संशोधनातून काढण्यात आला.
वॉशिंग्टन - धूम्रपानामुळे शरीरावर होणारे गंभीर परिणाम होतात, आता सर्वज्ञात आहे. मात्र, सिगारेट किंवा ई-सिगारेटच्या व्यसनामुळे डोळ्यांवर परिणाम होऊन दृष्टी गमावण्याचा धोका संभवतो किंवा काचबिंदूही होऊ शकतो, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका संशोधनातून काढण्यात आला.
या संदर्भात कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले. त्यात सिगारेट व ई-सिगरेट पिणाऱ्यांपैकी कोणाला डोळ्यांचे विकार झाले, याचा शोध घेण्यात आला. भारतात प्रौढ व्यक्तींपैकी २२ टक्के लोकांना सिगारेटचे व्यसन आहे व त्यामुळे दरवर्षी १० लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे भारतीयांसाठीही हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे.
सिगारेट, तंबाखूच्या व्यसनाने कॅन्सर, हृदयविकार असे अनेक आजार जडतात. मात्र, यांचा डोळ्यांवर ही विपरित परिणाम होतो, याबद्दल पुरेशी जनजागृती झालेली नाही. सिगरेटच्या धुरामध्ये सात हजार प्रकारची विषारी द्रव्ये असतात. सिगरेट पिणाऱ्याच्या रक्तवाहिन्यांत ही विषारी द्रव्ये जाऊन ती शरीरभर पसरतात. त्यामुळे जसे इतर आजार होतात, तसेच डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांवरही त्याचा परिणाम होत असतो.
सिगारेटमुळे डोळे कोरडे होणे, मोतिबिंदू, डायबेटिक रेटिनोपथी, मॅक्युलर डिजनरेशन, रक्तवाहिन्या खराब होणे असे परिणाम होऊ शकतात. त्यातील काही विकारांमुळे दृष्टी गमावण्याचा धोकाही संभवतो. डोळ्यांतील पेशींचेही सिगरेटमधील विषारी द्रव्यांमुळे नुकसान होते. धूम्रपानामुळे कोणत्याही वयात मोतीबिंदू होण्याचा धोका असतो, असे नेत्रविकार तज्ज्ञांचे मत आहे.
इतरांच्याही प्रकृतीवर होतो विपरीत परिणाम
सिगारेटचे व्यसन असलेल्यांना काचबिंदू होण्याची शक्यता असल्याचेही एका शास्त्रीय संशोधनात आढळून आले होते. डोळ्यांचे रक्षण करायचे असेल, तर सिगरेट पिणाऱ्यांनी या घातक व्यसनापासून त्वरित दूर झाले पाहिजे. सिगारेट पिणारा केवळ त्याच्याच प्रकृतीची नासाडी करत नाही, तर सिगारेटच्या धुरामुळे इतरांच्या प्रकृतीवरही परिणाम होत असतो.