आरोग्याच्या गोष्टी सवयींच्या खात्यात टाका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:31 AM2024-09-05T11:31:20+5:302024-09-05T11:31:33+5:30
Health News: आपल्या शरीराशी संवाद करा, प्राणायाम करा, प्रार्थनेचे महत्त्व... अशा गोष्टींबद्दल लिहिताना मला आठवत असते ते कोरोना नावाच्या एका टीचभर जिवाणूने काही काळापुरते आरपार बदलून टाकलेले आपले आयुष्य.
आपल्या शरीराशी संवाद करा, प्राणायाम करा, प्रार्थनेचे महत्त्व... अशा गोष्टींबद्दल लिहिताना मला आठवत असते ते कोरोना नावाच्या एका टीचभर जिवाणूने काही काळापुरते आरपार बदलून टाकलेले आपले आयुष्य. एकाकीपणाच्या धास्तीने आणि या अज्ञात शत्रूची चाल, हल्ल्याची तीव्रता हे काहीही समजत नसल्याने आपल्याला पुरते घेरून टाकलेल्या भीतीने किती बदलून टाकले आपले आयुष्य...!
कित्येक नव्या सवयी आपण स्वीकारल्या. रोज व्यायाम करायला लागलो, त्यासोबत प्राणायाम आवर्जून शिकून घेतला, रोजची प्रार्थना, जमेल तेवढे ध्यान आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले. आरोग्य आणि स्वच्छता, आहार यांबद्दल सजगता आली; पण कोरोनाने पाय काढता घेतला आणि जेवढ्या वेगाने आपण शहाणे झालो तितक्याच वेगाने पुन्हा आपला दिनक्रम ‘पूर्वपदावर’ (!) यायला लागला. सहज शांतपणे विचार करून बघू, कोरोनाच्या निमित्ताने आपण लावून घेतलेल्या सवयी वाईट होत्या? फक्त कोरोनाकाळातच त्या टिकून राहणाजोग्या होत्या? नेहमीच्या आयुष्यासाठी उपकारक नव्हत्या?..
या प्रश्नांची उत्तरे आपल्या जीवनविषयक मूल्यांमध्ये दडलेली आहेत. आपल्या आयुष्यात नेमके कशाला महत्त्व आहे? आरोग्य / स्वास्थ्य याचे आपल्या लेखी मोल काय? या प्रश्नांची उत्तरे आपण या निमित्ताने घेतली पाहिजेत. जेव्हा परिस्थिती पाठीत रट्टा हाणते तेव्हा नव्या, चांगल्या सवयी बाणवून घेण्यासाठी आपल्याला काही तासांचा अवधी पुरतो. पण परिस्थिती पालटताच गाडी तेवढ्याच वेगाने मागे येते, तेव्हा प्रश्न पडतो, या नव्या लावून घेतलेल्या सवयी ही आपल्यासाठी निव्वळ मजबुरी होती?
काही नव्या सवयी लावण्याची मजबुरी आपल्यावर जरूर आली, पण त्यामुळे बदललेले आयुष्य आणि आरोग्याचा दर्जा, याचे काय? आरोग्य सांभाळण्यासाठी नव्या सवयी जाणीवपूर्वक अंगिकाराव्या लागतात आणि लागलेल्या टिकवून ठेवाव्या लागतात. कोरोनाकाळात लागलेल्या सवयीमुळे आपल्या आरोग्याची गाडी रुळावरून उतरली नाही, हे ज्यांना समजले ती माणसे शहाणी म्हणायला हवीत.
सवयी आपल्या मेंदूचे कष्ट कमी करतात. एखादी सवय एकदा लागली की त्याबाबत विचार करण्याची मेंदूला गरज वाटेनाशी होते. आरोग्यासाठी करावयाच्या गोष्टी अशा सवय नावाच्या खात्यात टाकून द्या; म्हणजे त्या आपोआप होऊ लागतील. पुन:पुन्हा त्यांच्या मागे लागावे लागणार नाही.