पावसाळ्यात सुका खोकला आणि कफची समस्या टाळण्यासाठी आधीच वापरा 'हे' सोपे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 12:41 PM2020-08-05T12:41:57+5:302020-08-05T12:47:38+5:30
या समस्येपासून बचावसाठी वेळीच आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही घरगुती उपयांनी तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.
मार्चमध्ये जेव्हा कोरोना विषाणूंचा प्रसार झपाट्याने वाढत होता. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी लक्षणांबाबत गाईडलाईन्स देण्यात आल्या होत्या. या लक्षणांमध्ये सुका खोकला, सर्दी, ताप, श्वास घ्यायला त्रास होणं या लक्षणांचा समावेश करण्यात आला होता. जुलैमध्ये लासेंटमध्ये छापलेल्या एका अभ्यासानुसार रुग्णालयात भरती झाल्यानंतर रुग्णांना सुका खोकला आणि कफ होण्याची समस्या उद्भवली. सीडीसीनेही आपल्या गाईडलाईन्समध्ये सुका खोकला, कफ या लक्षणांचा समावेश केला होता. या समस्येपासून बचावसाठी वेळीच आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही घरगुती उपयांनी तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.
जास्तीत जास्त पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. सुका खोकला घालवण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्या. घश्याला आराम देण्यासाठी लिंबू आणि मध घातलेल्या गरम पाण्याचे सेवन करा.
खोकला जास्त येत असेल औषधी काढ्याचे सेवन करा. छातीत कफ जमा झाल्यास इतर ठिकाणी थुंकल्यामुळे संक्रमण पसरल्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी आधीच सावधगिरी बाळगून खोकला होण्यापासून बचाव करायला हवा.
फुफ्फुसांमध्ये जमा झालेले कफ मोकळे होण्यासाठी दिवसातून कमीत कमी तीनवेळा वाफ घ्या. व्यायाम केल्यानं, चालल्यानं फुफ्फुसांतील कफ बाहेर पडण्यास मदत होते. म्हणून दिवसातून २० ते ३० मिनिटं वेळ काढून व्यायाम करा.
मीठ हे एक जंतूनाशक आहे. त्यामुळे गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करायला हव्यात. त्यामुळे घश्यातील सुज कमी होण्यास मदत होते. पाण्याच्या गुळण्या करण्यासाठी स्वतःचा एक ग्लास वेगळा ठेवा. कारण अनेकांना हातात पाणी घेऊन गुळण्या करण्याची सवय असते.
शक्यतो ग्लासने पाणी घेऊन गुळण्या करा. हिरड्या संवेदनशील असतात. थंड पाण्याच्या वापराने तोंडात जळजळ होऊ शकते. त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करा. गुळण्या करताना तुम्ही या पाण्यात मीठ घालू शकता.
गुळण्या करताना कोमट पाण्यात बेकिंग सोडा घातल्याने श्वासांमधून येणारी दुर्गधी कमी होण्यास मदत होते. गुळण्या करत असताना तोंडाची हालचाल करा. जीभ आतल्याआत सगळ्या बाजूला फिरवा. पाणी घशापर्यंत नेऊन पुन्हा पुढे आणा. अशा पद्धतीने गुळण्या केल्यास घश्यातील वेदना कमी होण्यास मदत होईल.
२०-३० सेकंद गुळण्या करताना पाणी तोंडात ठेवल्यानंतर सावधगिरीने पाणी बाहेर फेकून द्या. गुळण्या करून झाल्यानंतर दात स्वच्छ घासा.
कोरोनाचं नवीन औषध लॉन्च; सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार
भारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार? भारत बायोटेकचा मानस