आरोग्याबाबतचे हे गैरसमज आपणही लहानपणापासून मानत आला आहात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 02:42 PM2017-11-13T14:42:49+5:302017-11-13T18:49:36+5:30
मानवी आरोग्याबाबतच्या या काही चुकीच्या समजुती आपल्या लहानपणी कोणातरी आपल्या मनावर बिंबवल्या.
मुंबई : आरोग्याच्याबाबतीत आपण नेहमीच जागृत असतो. इकडून तिकडून काही समजूतीही आपल्या कानावर आलेल्या असतात. या समजुतींमध्ये किती तथ्य असतं हे तपासण्याआधीच आपण त्या समजुती खऱ्या मानू लागतो. अशा कितीतरी गोष्टी आपण उगाचंच फॉलो करत असतो. अशाच काही गैरसमजुतींविषयी पाहुया.
थंड पाणी प्यायल्याने सर्दी होते
काहींना थंड पाण्याची फार अॅलर्जी असते. त्यांच्या मते, थोडंसं जरी थंड पाणी प्यायलो तरी लगेच नाक गळू लागतं. पण प्रत्यक्षात असं नसतंच. वातावरणातील तापमानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत नसतो असंही म्हणतात. सर्दी किंवा इतर आजार हे वातावरणात असलेल्या किटाणूंमुळेच होतात.
दिवसात ८ ग्लास पाणी प्या
काही आहारतज्ज्ञ सांगतात की, दिवसात किमान ८ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. आपलं शरीर दिवसाला २.५ लीटर पाणी पचवू शकतं. हे पाणी इतर अन्नपदार्थांच्यावाटे आपण प्यायलो तरी चालतं. मात्र काहीजण खाण्याव्यतिरिक्तही ८ ग्लास पाणी पितात, जे अत्यंत चुकीचं आहे.
च्युईंगम पोटात सात वर्ष राहतं
आपल्यापैकी अनेकांची लहानपणापासून अशी समजुत आहे की च्युईंगम आपल्या पोटात जवळपास ७ वर्ष न पचता राहतं. पण ही अगदी चुकीची समज आहे. इतर अन्नपदार्थ ज्याप्रमाणे आपल्या विष्ठेतून बाहेर पडतात त्याचप्रमाणे आपण च्युईंगम गिळल्यानंतर ते ही लगेच आपल्या विष्ठेतून बाहेर पडत असतं.
जवळून टीव्ही पाहील्याने डोळे खराब होतात
आपण लहान मुलांना नेहमी ओरडतो की जवळ जाऊन टीव्ही पाहिल्याने डोळे खराब होतात, चष्मा लागतो. मात्र यात काहीच तथ्य नाहीए. जवळून टीव्ही पाहील्याने किंवा मोबाईल हाताळल्याने डोळ्यांना थकवा किंवा डोळ्यांवर ताण येऊ शकतो मात्र डोळे खराब होत नाहीत.
जेवल्यानंतर स्विमिंग करू नये
खाऊन झाल्यानंतर स्विमिंग करू नये असं म्हणतात. खाऊन स्विमिंग केल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. मात्र उपाशी पोटी पाण्यात उतरल्याने पायांना वात भरू शकतो. त्यामुळे पाण्यात उतरण्याआधी थोडेसे हलके पदार्थ खालले तरी चालतात.
शेव्हिंग केल्याने दाढी वाढत राहते
काहीजणांचं असं म्हणणं असतं की सतत शेव्हिंग केल्याने दाढीच्या केसांची ग्रोथ वाढत जाते आणि दाढीचा रंगही डार्क होत राहतो. पण सतत शव्हिंग केल्याने असं काहीच होत नसल्याचे जाणकार सांगतात.
अरबट-चरबट खाल्याने अल्सरचा धोका
आपण सतत बाहेरचं अरबट चरबट खात असतो. त्यामुळे आपल्याला अल्सर होण्याची शक्यता असते असं काही जण म्हणतात. मात्र फास्ट फूड खाल्याने अल्सर होत नसून आपल्या जेवणातून हेलिबॅक्टर पिलोरी हे विषाणू सेवन केल्यास अल्सर होतो. काहीवेळा असे विषाणु रस्त्यावर असलेल्या अन्नावर बसतात. म्हणून बाहेरचं पदार्थ खाऊ नये असं सांगितलं जातं.
प्रोबायोटीकने सर्दीचा धोका टळतो
सर्दी असणारे रोज प्रोबायोटीकची औषध घेत असतात. पण प्रोबायोटीकच्या सेवनाने सर्दी कायमची जात नसून केवळ सर्दी होण्याचं प्रमाण कमी होत राहतं. प्रोबायोटीक्स रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता कमी होते.
मासिक पाळीच्या काळात गर्भधारणा होत नाही
गर्भधारणेच्या वेळेस मासिक पाळी येत नाही, अशी काहींची समजूत असते. मात्र गरोदर राहिल्यावरही मासिक पाळी येऊ शकते किंवा मासिक पाळी येऊन गेल्यावरही गर्भधारणा होऊ शकते.
गरोदरपणाचा काळ ९ महिन्यांचा असतो
असं म्हणतात की, नैसर्गिक प्रसुतीसाठी ९ महिने वाट पाहिली जाते. मात्र हा कालावधी ९ महिन्यांचा नसून ४० आठवड्यांचा असतो, म्हणजे ९ महिन्यांपेक्षाही अधिक काळ. गरोदर राहण्याच्या शेवटच्या मासिक पाळीपासून गरोदरपणाचे दिवस मोजले जातात.
चॉकलेटमुळे पुरळ उठतात
पुरळ उठण्याची खूप कारणं आहेत. आपण स्ट्रेसमध्ये असलो तरीही आपल्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो. पण चॉकलेट किंवा तळलेल्या पदार्थांमुळे पुरळ उठत नसल्याचं त्वचा अभ्यासक सांगतात. स्नायूंनी स्रवलेल्या पदार्थांमुळेही चेहऱ्यावर पुरळ उठण्याची शक्यता असते. त्यामुळे चॉकलेटमुळे किंवा तळलेल्या पदार्थांमुळे पुरळ उठणे ही एक चुकीची समजूत आहे.
गुडघ्यांवरील आघाताने होतो संधीवात
संधीवात होण्याची फार कारणं आहेत. अजिबात व्यायाम न करणे, आहारात होणारी स्थित्यंतरं या कारणामुळे संधीवात होतो. तरुणपणात गुडघ्यांना दुखापत झाली की म्हातारपणात संधीवात होतो अशी काहींची समजूत आहे, जी पुर्णपणे खोटी आहे.
झोपल्याने पाठदुखी कमी होते
पाठदुखी कमी करण्याची बेड रेस्ट घेतला जातो. मात्र नियमित कामे करूनही पाठदुखी कमी करता येते. त्यासाठी सतत झोपून राहण्याची आवश्यकता नसते.
अपरात्री जेवल्याने वजन वाढतं
रात्री-अपरात्री जेवल्याने वजन वाढतं अशी एक समजुत सगळ्याच घरात असते. मात्र दिवसातून आपण किती जेवतो, त्यामुळे किती कॅलरीज मिळतात हे महत्त्वाचं असतं. मात्र क्षमतेपेक्षा अधिक खाऊ नये.
सौजन्य - www.scoopwhoop.com