Health : आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2017 11:39 AM2017-06-09T11:39:06+5:302017-06-09T17:09:06+5:30
पावसाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली असून बहुतांश लोक आंनद लुटत आहेत. मात्र पावसाचा आनंद घेताना आरोग्याचीही काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात बरेच आजार डोके वर काढतात. पावसाळ्यात तयार होणाऱ्या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे डेंग्यू, हिवताप, मलेरिया, टायफाईट आदी आजार होतात. शिवाय पावसात भिजल्याने अंगावरील ओले कपडे, वातावरणातील दमटपणा आणि गारवा यामुळेही आजारांना निमंत्रण मिळू शकते. पावसाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यात होतात हे आजार
अंगावर ओले कपडे, जास्त वेळ पावसात भिजणे यांमुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात. यादिवसात प्रामुख्याने डास चावल्यामुळे हिवताप किंवा मलेरिया होतो. एनॉफिलीस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण लगेच होते. ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो. पावसाळ्यात पाण्याची प्रदुषण जास्त होते. त्यामुळे जुलबा आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसेच पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओली चप्पल पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.
काय उपाय कराल?
पावसात भिजल्यास तत्काळ कपडे बदलावे आणि अंग कोरडे करावे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराच्या परिसरात पाण्याची डबके तयार होऊ देऊ नयेत. शिवाय स्वच्छता ठेवून डास प्रतिबंधक औषधे, जाळ्या यांचा वापर करणे. अशुद्ध पाण्यामुळे पोटाचे विकार होऊ नयेत म्हणून स्वच्छ किंवा उष्ण पाणी प्यावे. एवढे प्रयत्न करुनही आजाराची काही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आहाराची काय काळजी घ्याल?
पावसाळ्यात पचनसंस्था मंद होते म्हणून जड आहार शक्यतो टाळावा. या दिवसात पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फुड, उपवासासाठी शेंगदाणे किंवा भगर हे पचन बिघडविणारे पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी बेसन लाडू, टोमॅटो सुप, वांगी, भेंडवळ, कैरी, लिंबु, चिंच, सुखे खोबरे आदी पचायला हलके आणि उष्ण पदार्थांचा वापर करावा.
Also Read : पावसाळ्यात घ्या सायकलिंगचा मनमुराद आनंद!
मुंबईकरांनी पावसाळ्यात ‘या’ गोष्टींचा अनुभव अवश्य घ्यावाच !