HEALTH : चाहूल उन्हाळ्याची...!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2017 12:23 PM2017-03-07T12:23:33+5:302017-03-07T17:54:22+5:30
कामानिमित्त बाहेर पडावे लागत असल्याने उन्हाचा तडाखा सहन करण्यापलीकडे असतो. पण काही छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास उन्हाचे तापणे काही प्रमाणात का होईला सुसह्य होईल.
उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमानाचा पारा वर चढायला लागला आहे. दुपारी तर बाहेर पडताना तापलेल्या सूर्याचे दर्शन बऱ्याचजणांना असह्य वाटू लागले आहे. मात्र कामानिमित्त बाहेर पडावे लागत असल्याने या वेदना सहन केल्याशिवाय पर्याचच नसतो. पण काही छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास उन्हाचे तापणे काही प्रमाणात का होईला सुसह्य होईल.
उन्हात वापरण्याचे गॉगल्स
दुपारच्या बाहेर पडताना किंवा उन्हात ड्राइव्ह करतेवेळी असा गॉगल आपल्याकडे हवाच. कारण गाडी चालविताना समोरून तुमच्या चेहऱ्यावर पडत असलेल्या प्रखर ऊन्हाचा तडाखा जाणवणार नाही. कडक उन्हात दिसणारे मृगजळही हा गॉगल डोळ्यांवर असला तर दिसत नाही.
हातमोजे (हॅण्डग्लोज)
उन्हाशी संपर्क आल्याने शरीराचा काही भाग काळवंडतो. बऱ्याचदा उन्हाच्या प्रखरतेने त्वचा जळते आणि तिचा वरचा थर सालींप्रमाणे निघतो. ही समस्या उद्भवू नये म्हणून हातमोजे वापरा. कारण यामुळे गाडी चालवताना हाताचे पंजे आणि बोटंही व्यवस्थित झाकली जातील. बाजारात बरीच स्टायलिश हँडग्लव्हज दाखल झाले आहेत. त्यांचा वापर करणंही फायद्याचं ठरेल.
नारळपाणी, ग्लुकोज, रसाळ फळे
शक्यतो दुपारच्या वेळेस बाहेर पडण्याअगोदर नारळपाणी घेतलं तर उत्तमच. तसेच दुर्गम स्थळी जाणार असाल, तर श्रीजल पावडरचं पॅकेट, ग्लुकोज किंवा ग्लुकोजयुक्त बिस्किटं जवळ बाळगा. भरपूर पाणी पिण्यासह या गोष्टींनी मळमळणं, डोकं दुखणं या गोष्टी टाळता येतील. उन्हाळ्यात शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी रसाळ फळे आणि विविध प्रकारचे ज्यूस खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
स्कार्फ
बऱ्याचदा स्कार्फला हटके स्टाइलसाठी वापरले जाते. मात्र उन्हाच्या तडाख्यासाठी वाचण्यासाठी याचा खरा उपयोग होऊ शकतो. चेहऱ्याभोवती स्कार्फ व्यवस्थित गुंडाळून मान आणि गळाही झाकता येतो. अनेकजण कॅप आणि स्कार्फ यांचं छान कॉम्बिनेशन करतात, त्यामुळे या दिवसात स्कार्फ जवळ ठेवाच.