जुळ्या बालकांवरील उपचारासाठी करावा लागला ८० किमीचा प्रवास; एका मुलाची प्रकृती अत्यवस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:27 IST2025-01-06T12:22:58+5:302025-01-06T12:27:25+5:30
पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सलाइनवर, उपचारासाठीच्या सुविधा उपलब्ध नाहीत

जुळ्या बालकांवरील उपचारासाठी करावा लागला ८० किमीचा प्रवास; एका मुलाची प्रकृती अत्यवस्थ
लोकमत न्यूज नेटवर्क
सफाळे : पालघर जिल्ह्यात शासकीय आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. माता आणि बालमृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्हा मुख्यालयालगतच्या ग्रामीण भागात सिझेरियन प्रसूतीसारख्या सुविधा नसल्याने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी गिराळे गावातून पालघरचे ग्रामीण रुग्णालय गाठावे लागले. परंतु, प्रसूतीनंतर जन्मलेल्या जुळ्यांना उपचारासाठी पालघरवरून जव्हारपर्यंतचा ८० कि.मी.चा प्रवास करावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचार मिळण्यासाठी उशीर झाल्याने जव्हार रुग्णालयात दाखल जुळ्यांपैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.
तपासणीदरम्यान प्रकृती स्थिर नव्हती
गिराळे ग्रामपंचायत हद्दीतील नगावे गावातील गर्भवती महिला निकिता नीलेश डगला हिला शुक्रवारी प्रसूतीसाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीदरम्यान तिने जुळ्यांना जन्म दिला; परंतु तपासणीदरम्यान जुळ्यांची प्रकृती स्थिर नसल्याने, तसेच नवजात बालकांवर उपचाराची सुविधा उपलब्ध नसल्याने जुळ्यांना पुढील उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डगला कुटुंबाला दिला होता.
उपचारास उशीर
अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात धावाधाव केल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली. सुमारे ८० किमी अंतर आणि अडीच ते तीन तासांचा प्रवास करून जुळ्यांना जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर उपचार मिळण्यासाठी उशीर झाल्याने दोघा जुळ्यांपैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती डगला कुटुंबीयांनी दिली.