HEALTH : उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2017 10:48 AM2017-03-29T10:48:58+5:302017-03-29T16:20:33+5:30
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकू लागल्याने जनजीवन विस्कळू लागले आहे. उन्हाचा परिणाम आरोग्याही होत असून अनेक शारीरिक व्याधीही डोके वर काढू लागले आहेत. आजच्या सदरात उन्हाच्या तडाख्यापासून काय काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊया.
सूर्य पृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी तळपत्या उन्हात बाहेर पडू नये. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते. शिवाय शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे. अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पाणी जास्तीत जास्त पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ज्यांना ह्रदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे. आहारामध्येही, रसदार फळांचा वापर करावा. तसेच मांसाहार कदापिही करु नये.
उन्हामुळे मृत्यू का होतो?
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
* आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७ अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
* घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
* पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
* जेव्हा बाहेरचं तापमान ४५ अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७ अंशाच्या पुढे जाऊ लागतं.
* शरीराचं तापमान जेव्हा ४२ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरश: शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
* स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
* रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषत: मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
* माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडू शकतात .
* उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान ३७ अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
उष्माघातापासून सुरक्षेसाठी अशी घ्या काळजी
* तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.
* सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.
* बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
* प्रवास करताना सोबत पाण्याची बॉटल घ्यायला विसरू नका.
* आपलं घरं थंड ठेवा, पडदे लावा, सनशेड बसवा आणि शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
* उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेहºयासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.
* अशक्तपणा, कमजोरपणा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
* ओआरएस, घरातील लस्सी, तोरणी, लिंबू पाणी किंवा ताक इत्यादी प्या.
* जनावरांनाही सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या.
* थंड पाण्याने आंघोळ करा.
* दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान उन्हात फिरू नका.
* मद्यसेवन, चहा, कॉफी आणि काबोर्नेटेड सॉफ ड्रिंक्स पिणं टाळा, त्यामुळे डिहायड्रेशन होतं.
* उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका.
* पार्किंग केलेल्या वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.