शरीरातील रक्ताची कमतरता दूर करेल अळीव; आजच करा सेवन, आजारही होतील गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 03:57 PM2024-07-12T15:57:52+5:302024-07-12T16:01:07+5:30
अळीव खाण्याने शरीराला अगणित असे फायदे मिळतात.
Aliv Benifits : साधारणत: आपल्याकडे अळीव म्हणजे बाळंतिणीचा खुराक असं म्हटलं जातं. पण अळीव खाण्याने शरीराला अगणित असे फायदे मिळतात. तरुणांपासून वयोवृद्धांनी देखील याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. फायबर, मिनिरल्स, व्हिटॅमिन तसेच अँटिऑक्सिडंट गुणांनी समृद्ध असणारे अळीव शरीरासाठी लाभदायक ठरतात.
अळीव हा भारतीय खान-पानातील एक महत्वाचा पदार्थ आहे. विशेषत बाळंतपणानंतर महिलेला याचे पौष्टिक लाडू तसेच हलवा आवर्जून खाऊ घातला जातो. अळीवाच्या बियांमध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे थंड वातावरणाच्या ठिकाणी अथवा हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये लोक आवडीने खातात. शिवाय अगदी मोजक्याच प्रमाणात याच्या बियांची पेज बनवून किंवा लाडू तयार करून कोणत्याही ऋतूमध्ये खाल्लं तर चांगलं असतं.
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत-
अळीवामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, असं आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. गर्भधारणेच्या काळात महिलांमध्ये अनेकदा लोह, हिमोग्लोबिन या गोष्टींची कमतरता असल्याने अॅनिमियासारख्या किंवा इतर समस्या उद्भवतात. अशावेळी महिलांनी चमचाभर अळीवाचा नियमित आहारात समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.
बद्धकोष्ठतेवर जालीम उपाय-
अळीवाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतं. ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या नाहीशा होतात. नियमितपणे त्याचं सेवन केल्यास पोट साफ राहतं.
अळीव आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. अळीवाची खीर, लाडू यासारखे पदार्थ आवर्जून खायला हवेत. दररोज १ चमचा अळीवाचा आहारात समावेश केल्यास केसही दाट, मजबूत आणि लांबसडक होण्यास मदत होते. असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.