जमिनीवर मांडी घालून बसण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे; तुम्हाला माहितही नसतील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 04:07 PM2024-05-24T16:07:21+5:302024-05-24T16:10:04+5:30
जमिनीवर मांडी घालून बसण्याचे असंख्य फायदे आहेत. ही पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.
Health Tips : जमिनीवर मांडी घालून बसण्याचे असंख्य फायदे आहेत. ही पद्धत आपल्याकडे फार पूर्वापारपासून चालत आलेली आहे. त्यासाठी जमिनीवर बसताना कसं बसावं, मांडी घालून बसण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खाली जमिनीवर मांडी घालून बसण्याला फार महत्व आहे. त्यामागे काही ठोस कारणेही आहेत. जमिनीवर बसणं, खाली बसून जेवण करणं, हाताने जेवण खाणं, तसेच जेवणासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करणं तसेच लवकर निजे लवकर उठें या म्हणीचं त्याकाळी अगदी कटाक्षाने पालन केलं जायचं. पण तुम्हाला माहितीये का? या सगळ्या गोष्टींमागे आरोग्याचा मंत्र लपलाय. परंतु काळानुसार या मांडी घालून बसण्याची पद्धत मागे पडली आहे. पण जमिनीवर मांडी घालून बसल्याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. पूर्वीपासून चालत आलेल्या या पद्धतीमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. जमिनीवर बसण्याचे नक्की काय फायदे आहेत हे आपण समजून घेऊयात...
'हे' आहेत फायदे-
१) बॉडी पॉश्चर सुधारतो-
जमिनीवर मांडी घालून बसल्याने शरीराची मुद्रा सुधारते तसेच पचनक्रियादेखील तंदुरुस्त राहते. शरीरामध्ये लवचिकता येते आणि शरीर मजबुत बनतं. शिवाय पाठीचा कणा सरळ राहतो.
पण जमिनीवर बसल्यावर त्याचे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुमची बसण्याची पद्धत योग्य असेल. चुकीच्या पद्धतीने बसल्यास त्याचे आरोग्यवर दुष्परिणाम होतात, असं तज्ज्ञ सांगतात.
२) पचनक्रिया सुधारते-
पोटाची पचनक्रिया सुधारण्यासाठी जमिनीवर मांडी घालून बसणं उत्तम आहे. त्याशिवाय मांडी घालून बसल्यावर ठरविक वेळेनंतर बसण्याच्या स्थितीत बदल करावा. तसं न केल्यास त्यामुळे बॅकपेनचा त्रासही होऊ शकतो. जर जमिनीवर बसल्यानंतर त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर समजुन जा की, तुमची बसण्याची पद्धत चुकीची आहे.
३) सांधेदुखीपासून आराम-
जर तुम्ही पाठदुखी किंवा कंबरदुखी यांसारख्या समस्येने त्रस्त असाल तर मुद्दामहून जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करावा. असं केल्याने गुडघेदुखी तसेच पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास कमी होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मांडी घालून जमीनीवर बसल्याने स्नायुंची चांगली कसरत होते. तसेच जमिनीवर बसल्याने पाठदुखीची तक्रार करणं विसराल.