Health Tips : सतत होत असलेल्या खोकल्याकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जीवघेणंही असू शकतं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 11:37 AM2022-01-26T11:37:28+5:302022-01-26T11:37:46+5:30
Causes of chronic cough : खोकल्याची अनेक कारणं असू शकतात जसे की, अॅलर्जी, इन्फेक्शन, स्मोकिंग इत्यादी. अशात जर तुमच्या खोकला जास्त काळ बंद होण्याचं नावच घेत नसेल तर याचं कारण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
Health Tips : खोकला एक अशी समस्या आहे ज्याकडे लोक नेहमीच दुर्लक्ष करतात किंवा या समस्येला हलक्यात घेतात. जास्तीत जास्त लोक यासाठी डॉक्टरकडे जात नाहीत. हिवाळ्यात खोकल्याची समस्या सामान्य असते. पण जर तुमचा खोकला अनेक आठवड्यांपर्यंत जात नसेल तर हा खोकला अनेक गोष्टींकडे इशारा करतो. अशात डॉक्टरकडे जाणं फार गरजेचं असतं. खोकल्याची अनेक कारणं असू शकतात जसे की, अॅलर्जी, इन्फेक्शन, स्मोकिंग इत्यादी. अशात जर तुमच्या खोकला जास्त काळ बंद होण्याचं नावच घेत नसेल तर याचं कारण (Causes of chronic cough) तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
किती प्रकारचा असतो खोकला
- एक्यूट खोकला - हा खोकला जवळपास २ ते ३ आठवड्यांपर्यंत राहतो आणि आपोआप ठीक होते.
- सबएक्यूट खोकला - हा खोकला ३ ते ८ आठवड्यांपर्यंत राहतो.
- क्रॉनिक खोकला - हा खोकला ८ आठवड्यांपेक्षा जास्त राहतो आणि एखाद्या मोठ्या आजाराचा संकेत असू शकतो.
जास्त काळ खोकला राहण्याची कारणं
धुम्रपान - जास्त काळ खोकला राहण्याचं मुख्य कारण धुम्रपानही असू शकतं. धुम्रपान करणाऱ्या लोकांना नेहमीच खोकल्याची समस्या होते. असं होतं कारण तंबाखूमधील केमिकल्स फुप्फुसात जळजळ निर्माण करतात. खोकल्याच्या माध्यमातून शरीर याला बाहेर काढण्यासाठी कफ तयार करतो. अनेकदा धुम्रपान करणारे लोक खोकल्याकडे लक्ष देत नाही. ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
कोविड १९ - जास्त दिवस खोकला राहण्याचं एक कारण कोविड १९ हेही असू शकतं. खोकला कोविड १९ च्या लक्षणांपैकी एक आहे. सामान्य फ्लूच्या तुलनेत कोविड १९ च्या कारणाने खोकला जास्त काळ राहतो. कोरडा खोकला याचं मुख्य लक्षण आहे.
इन्फेक्शन - इन्फेक्शन झाल्याने सर्दी-खोकला ठीक झाल्यावरही रूग्णाला बरेच दिवस खोकल्याची समस्या तशीच राहते. याप्रकारचा खोकला अनेकदा २ महिन्यांपर्यंत राहतो. ज्यात श्वसन मार्गात इरिटेशन होतं आणि तुम्हाला खोकल्याची समस्या होते. जी ठीक होण्यास वेळ लागतो.
अस्थमा - श्वसनादरम्यान ज्या हवेत आपण श्वास घेतो ती नाक, घशात आणि फुप्फुसात जाते. अस्थमा झाल्याने श्वसन मार्गाच्या आजूबाजूच्या मांसपेशी आकुंचण पावतात. यात कफ तयार होतो ज्यामुळे वायुमार्ग बंद होतो ज्यामुळे पुढे फुप्फुसांपर्यंत ऑक्सीजन पोहचत नाही. यामळे अस्थमाच्या रूग्णांना खोकला येतो.
जर्ड (GERD) - गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिजीज एक डायजेस्टिव डिसऑर्डर आहे. ज्यात पोटात निर्माण होणारं अॅसिड किंवा पोटातील अन्न अन्ननलिकेत परत येतं. यामुळे अन्ननलिकेच्या आतील थरावर जळजळ होऊ लागते. ज्यामुळे तुम्हाला खोकला येतो. ही एक ट्यूबसारखी संरचना आहे जी तुमच्या पोट आणि तोंडाला जोडते.
पोस्ट नेजल ड्रिप - सामान्यपणे नाकाच्या वाटे कफ शरीरातून बाहेर येतो. जेव्हा हाच कप नाकावाटे बाहेर न येता घशात पोहोचतो तेव्हा या स्थितीला पोस्ट नेजल ड्रिप म्हटलं जातं. जर कफ सामान्यापेक्षा अधिक प्रमाणात तयार होत असेल तर या स्थितीत पोस्ट नेजल ड्रिप ही समस्या निर्माण होते. सर्दी-खोकला आणि अॅलर्जी झाल्यावर समस्या अधिक वाढते. ज्यामुळे खोकला जास्त येतो आणि बराच काळ राहतो. थंड आणि कोरड्या हवेत श्वास घेतल्याने घशात खवखव होण्याची समस्या होऊ लागते.
फुप्फुसाचा कॅन्सर - जास्त काळ राहणाऱ्या खोकल्याचं कारण फुप्फुसाचा कॅन्सरही असू शकतो. फुप्फुसाच्या कॅन्सरमध्ये खोकताना रक्तही येऊ शकतं. पण जर तुम्ही धुम्रपान करत नसाल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कुणालाही फुप्फुसाचा कॅन्सर नसेल तर तुमच्या खोकल्याचं वेगळं कारण असू शकतं. तसं तर स्मोकिंग फुप्फुसाच्या कॅन्सरचं सर्वात मोठं कारण आहे. पण पॅसिव स्मोकिंग आणि वेगाने वाढत असलेल्या वायु प्रदूषणामुळेही फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो.
डॉक्टरांना कधी दाखवाल?
सामान्यपणे होणारा खोकला काही दिवसात बरा होतो. पण जर तुम्हाला खोकला ३ ते ४ आठवड्यांपर्यंत राहत असेल तर आणि खोकल्यासोबत श्वास घेण्यास त्रास होत असेल, ताप आणि खोकताना रक्त येत असेल तर जराही वेळ न घालवता वेळीच डॉक्टरांना दाखवा.