Health Tips: कलिंगड विकत घेताना दोन गोष्टी नक्की तपासून घ्या; नैसर्गिक आहे की कृत्रिम लगेच कळेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:45 PM2024-04-25T12:45:00+5:302024-04-25T12:46:09+5:30
Health Tips: पैसे वाया जाऊ नये आणि कृत्रिमरीत्या पिकवलेले कलिंगड खाल्ले जाऊ नये, असे वाटत असेल तर दिलेल्या दोन ट्रिक्स नक्की वापरून पहा!
मार्च आणि एप्रिलमध्ये उन्हाळ्याने जीवाची एवढी काहिली झाली आहे की आणखी दीड महिना उष्णतेत काढावा लागणार आहे हे नक्की! मे महिन्यात तर उन्हाळा ऐन भरात असतो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तो ओसरायला लागतो. यंदा बहावा वेळेत फुलल्याने तिथून पुढच्या साठ दिवसात पाऊस पडणार असे म्हटले जाते. तसेच यंदा पंचांग तसेच हवामान खात्यानेही पाऊस भरपूर पडणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. पण दिल्ली दूर आहे! आपण एप्रिल शेवटाच्या उम्बरठ्यावर उभे आहोत. पावसाच्या विचाराने मनाला गारठा वाटत असला तरी शरीराची उष्णता क्षमवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करणे आवश्यक आहे.
त्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे कलिंगड! ऋतुमानानुसार बाजारात आलेली फळं, भाज्या खाव्यात असे आहार तज्ज्ञ सांगतात. उन्हाळ्यात टरबूज आणि खरबूज यांचे सेवन शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. दीर्घकाळ पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी करणारे लोकही कलिंगडाचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात.
परंतु, बऱ्याचदा ३०, ४०, ८०, १०० असे वाट्टेल तेवढे पैसे देऊन आपण कलिंगड विकत आणतो आणि घरी येऊन चिरल्यावर ते पांढरे निघते नाहीतर पांचट निघते. घाऊक प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी काही विक्रेते फळ पिकण्याआधी रसायनाचे डोस देऊन फळांची वाढ करतात. अशा वेळी पिकलेल्या आणि नैसर्गिक रित्या बनवलेल्या कलिंगडाची निवड कशी करावी ते जाणून घेऊ.
>>कलिंगड विकत घेताना देठाचा भाग पूर्ण वाळला आहे का ते पाहून घ्या. तो तसा असेल तर कलिंगड आतून पूर्ण पिकलेले व गोड आहे असे समजावे. शिवाय कलिंगडाचा बाह्य रंग हिरवा असला तरी ज्या कलिंगडावर पिवळा डाग दिसेल ते नैसर्गिक रित्या वाढ झालेले आहे असे समजावे! कारण वेलीवरून पडल्याने कलिंगडाला पिवळसर रंग येतो.
>> दुसरी गोष्ट म्हणजे कलिंगड चिरल्यावर लाल भागाचा एक तुकडा पाण्याच्या भांड्यात टाकून बघावा किंवा टिश्यू पेपर लावून पाहावा. लाल रंग उतरला नाही तर ते फळ नैर्सर्गिक रित्या वाढ झालेले आहे याची खात्री करून घेता येते.
पुढच्या वेळी कलिंगड खरेदी करताना या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून पैसे तर वाया जाणार नाहीच, शिवाय उन्हाळ्यात थंडगार आणि गोड फळाचा आस्वादही घेता येईल!