शरीराच्या या अवयवांना पुन्हा पुन्हा हात लावणं पडू शकतं महागात, कसं ते वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 05:49 PM2022-08-16T17:49:30+5:302022-08-16T17:50:07+5:30
Bacteria : जर तुम्ही सवयीने किंवा नकळत या अंगांना पुन्हा पुन्हा हात लावत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. चला जाणून घेऊया कोणत्या अंगांना पुन्हा पुन्हा हात लावू नये.
Bacteria : बॅक्टेरिया हा जगातल्या प्रत्येक जागेत इतकेच नाहीतर आपल्या शरीरात आणि कपड्यांवरही असतात. काही बक्टेरिया हे आपलं आरोग्य चांगलं ठेवतात तर काहींमुळे आपलं आरोग्य धोक्यात येतं. आपल्या शरीराचे असे काही भाग असतात जिथे इतर अंगांच्या तुलनेत अधिक बॅक्टेरिया असतात. अशात जर तुम्ही सवयीने किंवा नकळत या अंगांना पुन्हा पुन्हा हात लावत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. चला जाणून घेऊया कोणत्या अंगांना पुन्हा पुन्हा हात लावू नये.
बोटांमध्ये बॅक्टेरिया
आपल्या जास्तीत जास्ती कामांसाठी आपण बोटांचा वापर करतो. त्यामुळे आपल्या बोटांमध्ये आणि हातांवर मोठ्या संख्येने बॅक्टेरिया असतात. अनेकदा या बॅक्टेरियांमुळे डोळ्यांमध्ये खाज येणे, डोळ्यांमधून पाणी येणे अशा समस्या होतात. याने डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
पिंपल्समध्ये बॅक्टेरिया
चेहऱ्यावर जर पिंपल्स झाल्यास सुरुवातील तुमचा हात आणि लक्ष पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे जातं. त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा हात लावला जातो. पिंपल्समध्ये वेगवेगळे हानिकारक बॅक्टेरिया असतात. जेव्हा तुम्ही त्यांना हात लावता तेव्हा ते बॅक्टेरिया चेहऱ्याच्या इतर भागांवर पसरतात. तिथेही तुम्हाला पिंपल्स येतात.
तोंडातील बॅक्टेरिया
अनेकदा काही लोक काही खाल्यानंतर दातांमध्ये अडकलेले कण काढण्यासाठी तोंडात हात घालतात. ओठांना पुन्हा पुन्हा हात लावतात. तुमच्या या सवयीमुळे तुमच्या हातांवरील बॅक्टेरिया तुमच्या तोंडात जातात. आणि तोंडातील बॅक्टेरिया बोटांना-हातांना लागतात. बॅक्टेरियांची ही अदलाबदली तुमच्या चेहऱ्यासाठी घातक ठरू शकते. तसेच तोंडाची दुर्गंधी, दातांचं दुखणं आणि दातांमध्ये किड अशा समस्या होऊ लागतात.
नाकात बोट घालणे
नाकात घाण जास्त असते. नाकात वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात. जेव्हा तुम्ही नाकात बोट घालता तेव्हा नाकातील बक्टेरिया तुमच्या बोटांना आणि हातांना लागतात. नाकातील हेच बॅक्टेरिया श्वासाच्या माध्यमातून फुफ्फुसात जातात आणि अनेक प्रकारच्या समस्या तुम्हाला होऊ शकतात.
नखांमध्ये बॅक्टेरिया
नखांच्या आतल्या बाजूस अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यामुळेच डॉक्टर तुम्हाला नखं न वाढवण्याचा सल्ला देतात. नखांमधील बॅक्टेरियामुळे तोंडांचे आणि पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जेवण तयार करण्याआधी आणि जेवताना हात चांगले स्वच्छ करणे गरजेचे असते.